Published On : Mon, Aug 24th, 2020

महापौरांनी घेतला ‘मिशन विश्वास’च्या कामाचा आढावा

Advertisement

नागपूर : कोव्हिड संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी मनपा प्रशासनातर्फे कार्यवाही सुरू आहे. शहरातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता ही कार्यवाही गतीशील होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसमस्या संशोधन व लोककल्याण समितीच्या सहकार्याने ‘नागपूर महानगरपालिका मिशन विश्वास’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या कामाचा रविवारी (ता.२३) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपाच्या धरमपेठ, हनुमान नगर आणि लकडगंज झोनमध्ये महापौरांनी अभियानातील संबंधित अधिकारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

‘नागपूर महानगरपालिका मिशन विश्वास’ अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसमस्या संशोधन व लोककल्याण समितीचे पदाधिकारी सेवा देत आहेत. मनपाकडे प्राप्त कोव्हिड पॉझिटीव्ह रुग्णांच्या झोन निहाय यादीनुसार मनपाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह समितीचे पदाधिकारी संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कार्य करतात. संबंधित कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करून ती मनपाच्या संबंधित झोन कार्यालयात सादर केली जाते. याशिवाय बाधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली जाते. मनपाचे अधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी हे समन्वयातून बाधितांना योग्य वैद्यकीय सल्ला तसेच उपचार मिळवून देण्यासाठी कार्य करतात.

या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्रुट्या आणि त्यावरील सूचना यावेळी महापौर संदीप जोशी यांनी मागविल्या. शहराची आजची स्थिती पुढे आणखी बिघडू नये यासाठी प्रत्येक अधिकारी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावे. बाधितांशी तात्काळ संपर्क करून त्यांची स्थिती जाणून योग्य उपचार उपलब्ध करून देण्याकडे प्राधान्य द्यावे, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.