नागपूर, ता. २३ : शहरात रोजच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यात भर म्हणजे रोजचा मृत्यूदरही ३० ते ४० असा आहे. सर्वत्र असा धोका असतानाही काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोव्हिडच्या प्रसाराचे कारण ठरत आहेत. अशा नियम तोडणाऱ्या आणि स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्यांना महापौर संदीप जोशी यांनी चांगलेच फटकारले.
शहरात कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता रविवारी (ता. २३) महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण शहरात पाहणी केली. स्वतःच्या गाडीतून फिरत त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. दुकानांमध्ये गर्दी करू नये, पाच पेक्षा जास्त लोक कोणत्याही आस्थापनांमध्ये असू नयेत, मास्क लावणे, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करणे या संदर्भात गाडीतून माईकवरून महापौरांनी जनजागृती केली.
आज आपण आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन न केल्यास आपण स्वतःच आपल्या आणि दुसऱ्यांच्याही कुटुंबासाठी धोका ठरू शकतो. सद्यस्थितीत नागपूर शहरात दिवसाला दररोज एक हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय ३० ते ४० रुग्ण दररोज दगावत आहेत. नागरिक सोशल डिस्टंनसिंगचे पालन करीत नाही. अनेक जण मास्क न लावताच वावर करीत आहेत. दुकानांमध्ये गर्दी देखील मोठ्या प्रमाणात करीत असतात. ही आपली बेजबाबदार वागणूक संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येकाने सध्याच्या या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. काही लक्षणे आढळल्यास किंवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास तात्काळ आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करावी, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.