Published On : Mon, Jul 5th, 2021

सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांच्या कार्यवाहीचा महापौरांनी घेतला आढावा

Advertisement

नागपूर: नागपूर शहरातील सफाई कर्मचा-यांच्या विविध समस्यांच्या संदर्भात आधीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीचा सोमवारी (ता.५) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये त्यांच्या अध्यक्षतेत यासंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती महेश महाजन, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, सफाई कर्मचारी प्रतिनिधी जयसिंग कछवाह, सतीश डागोर, प्रकाश चमके, सुनील तांबे, किशोर मोटघरे, विशाल मेहता आदी उपस्थित होते.

सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनावर काही महिन्यांपूर्वी महापौरांनी विशेष बैठक बोलावून त्याबद्दल आवश्यक ते निर्देश प्रशासनाला दिले होते. यासंदर्भात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसावे, शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा बजावतात. २० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या या सफाई कर्मचा-यांना स्थायी करण्याचा महत्वाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

स्थायी झालेल्या सर्व ऐवजदार सफाई कर्मचा-यांना इतर कर्मचा-यांप्रमाणेच सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्याचे निर्देश महापौरांनी बैठकीत दिले होते. याबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची विस्तृत माहिती त्यांनी जाणून घेतली.

महापौरांच्या निर्देशानुसार सफाई कर्मचा-यांच्या संपूर्ण प्रश्नांच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपायुक्त (आरोग्य), सहा.आयुक्त (सा.प्र.वि), वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. सफाई कर्मचा-यांच्या विविध समस्यांबाबत समितीमार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सुद्धा यावेळी महापौरांनी आढावा घेतला. आपल्या शहराची स्वच्छ, सुंदर ही प्रतिमा उजळत ठेवण्यासाठी अहोरात्र सेवा देणा-या सफाई कर्मचा-यांना त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करावे लागू नये, त्यांच्या समस्या सोडविल्या जाव्यात यादृष्टीने सुरू असलेल्या कार्यवाहीला गती देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.

श्रमसाफल्य योजने अंतर्गत २० वर्षाची सेवा झाली अश्या सफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी घर मिळण्याच्या दृष्टीने म.न.पा.कडे सद्या जागा उपलब्ध नसल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे जागेची मागणी सफाई कर्मचारी संघटनेने जागा सूचविल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करता येईल.

तसेच कोव्हिड कालावधीमध्ये जे कर्मचारी फ्रंट वर्कर म्हणुन मृत्यू पावले ते ऐवजदार असले तरी त्यांचा समावेश करुन अनुदान उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असेही महापौरांनी निर्देश दिलेत.