Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 13th, 2020
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  अधिकाऱ्याला अपशब्द प्रकरणात महापौरांनी स्वत: मागितली माफी

  आंदोलन मागे घेण्याची विनंती : शहराच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन

  नागपूर: ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी एका प्रकरणात नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना अपशब्दाचा वापर केला. त्याचे समर्थन मुळीच करणार नाही. श्री. दटके यांनी स्वत: गावंडे यांची माफी मागितली. शहराचा महापौर या नात्याने दटके यांच्या वतीने मी सुद्धा गावंडे यांची माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखवून अधिकाऱ्यांनी चालविलेले आंदोलन मागे घ्यावे आणि शहर विकासासाठी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

  नरसाळा येथील एका रस्त्याचे काम दोन दिवसांपासून थांबले आहे. रस्त्यात असलेल्या बांधकामाला नगर रचना विभागाने परवानगी दिली असल्याने त्याचा रस्ता बांधकामावर परिणाम झाला. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावे आणि निर्णय घ्यावा, असे ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके यांनी नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना सांगितले. मात्र पालकमंत्र्यांच्या बैठकीला जायचे असल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या तोंडून अपशब्द निघाले असतील.

  यासंदर्भात अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत मनपा आयुक्तांना निवेदन सोपविले. या निवेदनातून त्यांनी लेखनी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. सोबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

  श्री. प्रवीण दटके गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत. ते नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढले आहेत. दरम्यान, शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या कामांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासकामांच्या तळमळीतून त्यांच्या तोंडून अपशब्द निघाले असतील तर त्याचे समर्थन आपण मुळीच करणार नाही. अधिकाऱ्यांच्या भावना आपण समजू शकतो. त्यांनी निश्चितच एक दिवस लेखनी बंद आंदोलन करावे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहणार नाही, हा निर्णय विकासकामांसाठी मारक आहे. हा निर्णयच दुर्देवी आहे. नगरसेवक प्रवीण दटके यांनी झालेली चूक मान्य करीत श्री. गावंडे यांची माफी मागितली. त्यामुळे हा विषय येथे संपायला हवा होता. अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ माझ्याकडे आल्यानंतर श्री. दटके यांच्या वतीने मी सुद्धा त्यांची माफी मागितली. किमान येथे तरी हा विषय संपणे अभिप्रेत होते. मात्र, गावंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी हा विषय ताणून धरल्याने पेच निर्माण झाला असल्याची खंत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

  ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी इतके ताणावे, हे डोके त्यांचे नाही. त्यांच्या देहबोलीवरून ते लक्षातही येते. मात्र, यामागे कोण, हेसुद्धा त्यांनी सांगितले नाही. असे विषय घडत असतात आणि चूक केलेल्या व्यक्तीने माफी मागितल्यानंतर ते संपतही असतात. पण दुर्देवाने आज प्रवीण दटके आणि मी स्वत: माफी मागितल्यानंतरही विषय संपला नाही. अधिकाऱ्यांनी आज एक दिवसासाठी लेखनी बंद आंदोलन निश्चितच करावे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना उपस्थित न राहण्याचा निर्णय त्यांनी मागे घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145