नागपूर : विजयवाडा रेल्वे स्टेशनवर आपल्या आई – बाबासोबत झोपलेल्या दोन वर्षीय निमिता सोरेन हिचे एका अज्ञात महिलेने अपहरण केले. ही घटना ४ एप्रिल रोजी घडली असून आंध्रप्रदेश पोलिसांसोबत गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी), आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने (आरपीएफ) देखील या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
9 एप्रिल रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करणाऱ्या विजयवाडा पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपास करण्यास सुरुवात केली. यादरम्यान विस्कटलेले केस असलेल्या एका अज्ञात महिलेने मुलीला उचलून नेल्याचे त्यांना आढळले. मुलीचे अपहरण केल्यानंतर काही वेळातच ती महिला तिरुपती एक्स्प्रेसमध्ये चढली.
तिरुपती एक्स्प्रेस थांबलेल्या स्थानकांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने, विजयवाडा पोलिसांना आढळले की ती महिला 5 एप्रिल रोजी नागपूर येथील फलाट क्रमांक एकवर उतरली होती. तिला अखेरचे रेल्वे स्थानकाबाहेर मुख्य गेटकडे जाताना पहिले गेले.
विजयवाडा पोलिसांचे एसआय एम दुर्गा महेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक आणि एसआय बलराम झाडोकर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस गुन्हे शाखेचे पथक नागपूर रेल्वे स्थानक आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहेत.
डीसीपी सुदर्शन यांनी आंध्र प्रदेश संघाला मदत करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यासाठी एकत्रित पथके आता विविध ठिकाणी भेट देत आहेत. कमांड-अँड-कंट्रोल (सीओसी) केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही संकेतांसाठी स्कॅन केले जात आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पीडितेचे पालक पश्चिम बंगालचे आहेत आणि मजूर म्हणून काम शोधण्यासाठी ते विजयवाडा येथे गेले होते. यादरम्यान या अज्ञात महिलेने भीक मागण्याच्या उद्देशाने त्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण केले असावे. तसेच विजयवाडा येथे भीक मागण्यास सक्त मनाई असल्याचे याठिकाणाहून त्या महिलेने मुलीचे अपहरण करून नागपुरात पळ काढला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. नागपूरच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसत आहे आणि ती भीक मागून जगत असावी, अशी शंका असल्याचे ते म्हणाले.