नागपूर : नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (DBASSIMER) ला राज्य सरकार निधी देणार असल्याची नुकतीच घोषणा केली.
उत्तर नागपुरात या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या परिसरातील गोरगरीब नागरिकांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी तसेच त्यासाठीचा खर्चही त्यांना करता यावा, या अनुषंगाने आम्ही या रिसर्च सेंटरच्या उभारणीसाठी निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. यासंदर्भात मी न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. हे या क्षेत्रातील उच्च दर्जाचे रुग्णालय असेल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.ते कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब अंबेडकर इंटरनेशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री आमदार नितीन राऊत यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. यावेळी ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमुळे सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. एकंदरीत 1,165 कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहे. हॉस्पिटल इंदोरा येथे बांधले जाईल, तर कॉलेज ऑटोमोटिव्ह स्क्वेअरजवळ बांधले जाईल,असे राऊत म्हणाले दरम्यान कामठी येथील कन्व्हेन्शन सेंटरच्या सुंदर वास्तुकलेचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केंद्राचा परिसर विवाह किंवा रिसेप्शनसाठी देऊ नये, असा इशारा दिला.
ज्या ठिकाणी लोक दारू पिऊन गोंधळ घालतात अशा कार्यक्रमांसाठी तुम्ही हे दिल्यास मी निषेध करेन. या सुंदर संरचनेचा उपयोग संशोधन उपक्रम आणि अभ्यासासाठी केला पाहिजे. तसेच कलांचे प्रदर्शन आणि भगवान बुद्ध आणि डॉ आंबेडकर यांच्याशी संबंधित कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी याचा उपयोग करण्यात यावा. गरज भासल्यास मेंटेनन्स चार्जेस देण्यास अर्थमंत्री तयार आहेत,असेही गडकरी म्हणाले.