Published On : Wed, May 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शहरातील विविध भागांत अत्याचाराच्या चार घटना उघड

Advertisement

नागपूर : उपराजधानी नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला डॉक्टर आणि दोन अल्पवयीन मुलींसह चार तरुणींवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे.

ओळखीचा गैरफायदा घेत महिला डॉक्टरवर अत्याचार-
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४८ वर्षीय महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती दीर्घकाळ आजारी असल्याचा फायदा घेत आरोपी निलेश नेवारे (रा. बाबुळखेडा) याने महिलेशी जवळीक वाढवली. त्यानंतर वाडी परिसरातील एका गोदामात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यावर मारहाण करून धमकावल्याची तक्रार पीडितेने दिली असून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

इंस्टाग्रामवरील मैत्री अल्पवयीन मुलीसाठी ठरली सापळा-
कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. भीलगाव येथील अभिषेक धनेश यादव (वय १९) याने लग्नाचे आमिष दाखवत मुलीशी संबंध प्रस्थापित केले. आरोपीने धार्मिक स्थळी सिंदूर भरून लग्नाचे नाटक केल्याचाही आरोप आहे.

पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिने लग्नाची मागणी केली असता आरोपीने नकार देत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार-
कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गंभीर घटना घडली. मजुरीसाठी बाहेर जाणाऱ्या महिलेची १६ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आरोपी वंश वाघमारे (वय २०) याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर आईने मुलीकडे चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. कामठी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी-
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरुणीने प्रियकराविरोधात अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली आहे. मिनीमाता नगर येथील देवा साहू याच्यासोबत तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र २०२१ पासून आरोपी तिचे शोषण करत असल्याचा आरोप आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले.

या प्रकरणी कलमना पोलिसांनी अत्याचार आणि धमकीचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांनी सर्व प्रकरणे गांभीर्याने घेतली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.