Published On : Sat, Mar 24th, 2018

दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण करणार

Advertisement

नागपूर: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो शासनाकडे पाठवून त्या संदर्भात उच्चस्तरीय बैठकी घेतल्या जाणार आहेत.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या प्रस्तावाला अंतिम रुप देण्यासाठ़ी मुख्य सचिव व मुख्यमंत्री स्तरावर बैठकी घेण्यात येतील. सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाबाबत भाग 1 चा हा प्रस्ताव असून टप्प्याटप्प्याने अन्य भागांचे काम करण्यात येणार आहे. विकास आराखड्याची जबाबदारी नासुप्रकडे देण्यात आली असून मे. डिझाईन असोसिएट्स इन्कॉर्पोरेशन नोएडा यांची या प्रकल्पासाठी सल्लागार वास्तुविशारद म्हणून 2016 मध्ये नियुक्ती झाली आहे. या कंपनीने डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या 22.4 एकर जागेवरील प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला नाही. त्यानुसार 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या कामांमध्ये व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पथपथ, भाविकांसाठी सुविधा क्षेत्र, प्रसाधने, पिण्याच्या पाण्याची सविधा, विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तुपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, ऑडिओ सिस्टिम, किरकोळ कामे आदींचा समावेश करण्यात आला आहे.