Published On : Fri, Nov 22nd, 2019

महिला पोलिस अधिकाऱ्याचे लचके तोडणारे ‘ ते ‘ कुत्रे गँगस्टर शेखू खानचे

 

नागपूर: फ्लॅटमध्ये राहणाऱ्यामध्ये झालेल्या आपसी वादातून एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने स्थानिक महिला पोलिस अधिकाऱ्यावर कुत्र्यांच्या मदतीने हल्ला चढविल्याचा आरोप केला जात आहे. ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत अलिकडेच उघडकीस आली आहे. प्रकरणातील जखमी महिला अधिकारीचे नाव डिम्पल उर्फ शुभांगी राजेंद्र नायडू-पवार असे आहे. ‘नागपूर टूडेच्या’ सूत्रधारानुसार हल्ला करणारे कुत्रे ही कुख्यात शेखू गँगचे असल्याचे समोर आले आहे.

न्यू मनिष नगरात येथील तीर्थ पॅलेस अपार्टमेंटमध्ये एएसआय डिम्पल नायडू राहतात. त्या शहर पोलीस दलात, बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्या ज्या इमारतीत राहतात तेथेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रजत देशमुखही राहतात. रविवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास डिम्पल कार्यालयातून घरी परतल्या. यानंतर त्या स्वतःच्या बाळाला (१ वर्षे) घेऊन फिरविण्याच्या उद्देशाने खाली आल्या. यावेळी फ्लॅटमधील रहिवासी संजना देशमुख खाली थांबलेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबचत तीन पाळीव कुत्रे होते. त्यांनी कुत्र्यांना ‘गो शूट गो’ म्हणताच या तिनही कुत्र्यांनी फिर्यादी डिम्पल यांच्यावर हल्ला चढविला. छोट्या बाळाला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डिम्पल यांना कुत्र्यांनी अक्षरश: लोळविले. दरम्यान डिम्पल यांची आरडाओरड ऐकून त्यांचे पती राजेंद्र पवार हे त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी या कुत्र्यांनी राजेंद्र यांच्यावरही हल्ला चढविला. सुदैव म्हणजे, या दरम्यान दोघांनीही बाळाला सुरक्षित ठेवले.

ह्या संपूर्ण प्रकरणात ‘नागपूर टुडेने’ डिम्पलच्या शेजारी राहणारे राजकीय पक्षाचे रजत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, सहायक पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या खोट्या बोलत आहेत. त्या आमच्यासोबत क्षुल्लक कारणावरून नेहमीच वाद घालतात. त्यांनी स्वतःच कुत्र्याला लाथ मारली. यामुळे चिडलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. यानंतर बाकी दोन कुत्रेसुद्धा जाऊन पडले आम्ही त्यांना कुत्र्यांपासून सोडविले आणि वाचविले. घटनेच्या वेळी त्यांच्याजवळ चिमुकली मुलगी नव्हती. घटनेनंतर डिम्पल यांनी प्रसारमाध्यमाकड़े सत्य घटना न सांगता खोटी माहिती दिली. त्यामुळे आपली बदनामी झाली असून आपण डिम्पल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकू आणि पत्रपरिषदही घेऊ , असे देशमुख म्हणाले.

माहितीनुसार मुळात हे कुत्रे त्यांचा साळा विजेंद्र सिंग यांच्या मित्राचे आहेत. हे तिनही कुत्रे आजारी असल्याने मानवतेच्या नात्याने आम्ही त्यांना घरी ठेवले होते, असे देशमुख म्हणाले. मात्र त्यांनी कुत्र्यांच्या मालकाविषयी आपणास माहिती नसल्याचे सांगितले. घटनेविषयी अधिक माहिती घेण्याकरिता बेलतरोड़ी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तालेवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, फिर्यादी डिम्पल यांच्या प्रथम तक्रारीवरून आरोपी विरोधात भा.दं.वि. ३०८ ,१९ ,२८९ ,३३८ ,३४ नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.

‘नागपूर टूडेच्या’ विशेष सुत्रानुसार घटनेतील ३ कुत्र्यांपैकी दोन कुत्रे हे रॉड व्हीलर प्रजातीचे आहे तर उरलेला एक कोकिशन शेफर्ड प्रजीताचा आह. रॉड वीलर अत्यंत चिड़चिड़ा आणि आक्रमक आहेत. विदेशात ह्या प्रजातींचे कुत्रे पाळण्यावर बंदी आहे. या कुत्र्यांना राग आल्यास ते मालकावरसुद्धा जीवघेणा हल्ला करतात. विदेशात घडलेल्या एका प्रकरणात या कुत्र्यांनी मालकासह कुटुंबातील तिघांचा जीव घेतला होता.

मुळात हे कुत्रे कुख्यात गँगस्टर गुलामनवाज उर्फ शेखू खान याची असल्याची माहिती समोर येत आहे. शेखू खान सध्या एका खंडणी वसूली प्रकरणात त्याच्या साथीदारासोबत मकोका कारवाई अंतर्गत जेरबंद आहे. अटकेपासून गँगस्टर शेखू खानचे भयानक कुत्रे हे अनाथ झाले आहेत. तेव्हापासून ते शेखूच्या मित्रांकडे, परिचितांकडे, वन्यप्रेमींकडे राहतात.

शेखु खान सध्या अंबाझरी किडन्यापिंग आणि १० लाखाच्या खंडणी वसुली प्रकरणात त्याच्या साथीदारासोबत मकोका कारवाई अंतर्गत जेरबंद आहे. ह्या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात क्राईम ब्रांचच्या टीमने शेखु गँगच्या मुसक्या आवरल्या होत्या. तसेच साथीदारासहित मकोका अंतर्गत कार्रवाई केली होती. विशेष म्हणजे, क्राईम ब्रांचच्या एका पथकाने शेखूला अटक होण्यापूर्वी, शेखु कुठे आहे याची गोपनीय माहिती मिळविली होती. त्यानंतर मनीष नगर येथे एका बंगल्यावर छापा मारला होता. तेव्हासुद्धा शेखुने पाळलेले भयानक तीन रॉडविलर , एक कोकिशन शेफर्ड आणि एक बीगल प्रजातीचे कुत्रे कंपाउंडमध्ये मोकाट होते. यामुळे पोलिसांना घरात छापा टाकायला फार अड़चन झाली होती. तरीसुद्धा क्राईम ब्रांचने दुसऱ्याच्या बिल्डिंगवरून उड़ी मारून छापा टाकला होता. शेखुचा साथीदार शिवाला आणि शेखूची प्रेयसीला माउजर सहीत अटक करण्यात आले होती. छाप्याची माहिती मिळताच शेखू फरार झाला होता. त्यानंतर क्राईम ब्रांचनी शेखुला धरमपेठ येथून अटक केली होती. तेव्हापासून गँगस्टर शेखूचे भयानक कुत्रे हे अनाथ झालेले आहे म्हणूनच ते कुत्रे कधी त्याच्या मित्रांकडे, परिचितांकडे , वन्य प्रेमीकड़े राहत असतात. या कुत्र्यांच्या मुसक्या आवळणे फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात ह्या कुत्र्यांमुळे जीवघेणी घटना घडू शकते.