चिखलदरा येथे क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित जनसंवाद व माहिती मेळाव्याचे उद्घाटन संपन्न
नागपूर/ चिखलदरा: स्वच्छता ही निरंतर प्रकिया असून स्वच्छतेच्या या राष्ट्रीय अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी नगर परिषद चिखलदरा येथे क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आज आयोजित जनसंवाद व माहिती मेळाव्यात केले.केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय अमरावती व नगर परिषद चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे ‘स्वच्छ भारत – स्वच्छ सर्वेक्षण 2018 ‘मध्ये लोकांचा सहभाग वाढवण्य़ाच्या उद्देशाने विशेष प्रचार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर परिषद चिखलदराच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपनगराध्यक्ष शेख अब्दूल शेख हैदर, माजी नगराध्यक्ष राजेन्द्रसिंह सोमवंशी, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, नगर परिषद चिखलदराचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक जितेन्द्रकुमार झा, भारतीय टपाल विभागाचे सहायक अधिक्षक़ गजेन्द्र जाधव, पांडूरंग गेडाम, सामाजिक कार्यकर्ता सुनिल भालेराव आणि न.प. चे सर्व नगरसेवक, नगरसेविका व इतर मान्यवरही याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ् भारत अभियानाच्या माध्यमातून 2019 पर्यंत देशाला स्वच्छ करण्याचे लक्ष्य ठरवले असून हे लक्ष्य गाठण्यासठी सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक असून स्वच्छता ही राष्ट्रीय चळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा भिलावेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रत्येक नागरीकाने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या न.प चिखलदराच्या नगराध्यक्षा विजया सोमवंशी यांनी केले तसेच स्वच्छता मोहिममध्ये नगर परिषदकडून करत असलेल्या कार्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी नगर परिषद स्वच्छता विभागाकडून शहरातील जमा होणा-या सूका आणि ओल्या कच-याचे वर्गीकरण व व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात असून या कच-याच्या माध्यमातून गांडूळ खत प्रकल्प राबविला जात असल्याचे सांगितले.
भारतीय डाक विभागाचे सहायक अधिक्षक गजेंद्र जाधव यांनी सुकन्या समृध्दी योजना आणि डाक विभागाच्या इतर महत्वाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अग्रणी व्यवस्थापक जितेन्द्र कुमार झा यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती विषद केली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सौभाग्य-सहज बिजली हर घर योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले. चिखलदरा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया व यूनियन बॅंक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका योजनाच्या लाभार्थ्यांना सुमारे 5 लाखाचे अर्थसहाय करण्यात आले. सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत पासबूक आणि ग्रामीण टपाल विमा योजनाचे करारपत्र मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या स्थळी भारतीय़ टपाल विभाग, महावितरण, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया व यूनियन बॅंक ऑफ इंडिया, स्वच्छ भारत मिशन पं.स चिखलदरा, जिल्हा कुष्ठरोग विभाग, तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय आदी विभागांचे माहिती प्रद्रर्शनी स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, स्वच्छ शाळा आणि स्वच्छ हॉटेल स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सिपना कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विदयार्थी, शाहीर डी. आर. इंगळे व कलासंच बुलडाणा आणि नवचैतन्य कलामंच घाटंजी यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व हगणदारी मुक्त शहर या विषयांवर विविध मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर कार्यलयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्षेत्रीय प्रचार कार्यालय, अमरावतीचे कार्यालय प्रमुख अंबादास यादव यांनी केले.
कार्यक्रमाच्या पुर्वी सकाळी शहरातून सर्व शाळेतील विदयार्थी आणि आदिवासी बांधवाच्या नृत्यातून नगर परिषद विश्रामगृहाच्या प्रांगणातून जन जागरण रॅली काढ्ण्यात आली या रॅलीस नगराध्यक्ष विजया सोमवंशी व मनोज सोनोने क्षेत्रीय प्रचार अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत- स्वच्छ सर्वेक्षणाच्या घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे संजय तिवारी, रामचन्द्र सोनसळ, स्वच्छतेचे पर्यवेक्षक़ रशिद नवरंगबादी, प्रमोद जोशी, शेख नदिम शेख चांद, श्रीकृष्ण सगणे, नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास नगर निवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.