Published On : Sun, Sep 15th, 2019

सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर: कीटकनाशके व खतांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून प्रदुषणमुक्त व रसायनमुक्त शेती करावी. कमी उत्पादन खर्चामध्ये सेंद्रीय शेती करुन शेतकऱ्यांमध्ये सेंद्रीय शेतीचे महत्व पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रस्ते, परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हॉटेल लि मेरिडीयन येथे आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत सेंद्रीय शेतीचे महत्व विषद करणाऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

या परिषदेच्या अध्यक्षस्थनी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस.के.चौधरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले, माफसूचे कुलगुरु आशिष पातूरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, प्राध्यापक (विस्तार शिक्षण विभाग) डॉ. मिलींद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

सेंद्रीय शेतीचे महत्व विषद करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, भारतामध्ये कीटकनाशके तसेच खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमीनीचा पोत खराब होतो. कीटकनाशकांच्या अति वापरांमुळे नागरिकांच्या आरोग्यांच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, ही काळाची गरज आहे. तसेच नागरिकांनी देखील सेंद्रीय भाजीपाला, फळफळावळे सेवन करुन त्याबाबत आग्रही असावे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतकी उत्पादनाची मागणी वाढल्यास ते देखील सेंद्रीय शेतीकडे वळतील व त्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचा प्रती एकरी उत्पादन खर्च कमी व्हावा, शेतकरी स्वत: बियाणे, खते यांची निर्मिती करु शकेल. यासाठी सेंद्रीय शेती परिषदेच्या माध्यमातून असे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. सतत कीटक नाशकांची फवारणी तसेच शेतीला पुरविले जाणारे पाणी व मृदा परिक्षण न झाल्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी होवून उत्पादन खर्च जास्त होतो. यासाठी मृदा व पाण्याचे परिक्षण शेतकऱ्यांनी करावे.

तसेच कमी खर्चामध्ये प्रदुषणमुक्त व रसायनमुक्त शेती करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत अवगत करावे. आज युनायटेड स्टेट्स, दक्षिण युरोपियन आणि जापान हे देश सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या अन्नधान्याच्या प्रमुख बाजारपेठ आहेत. तेथील शेतकरी सेंद्रीय शेती करुन कीडनाशके विरहीत अन्नधान्य उत्पादन कसे करतात, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. भारतामध्ये साखर, तांदूळ यासारख्या खाद्यान्नाची आवश्यकतेपेक्षा जास्त निर्मिती होते. परंतू खाद्य तेलाचे उत्पादन तुलनेत कमी होते. यामुळे शेतकी उत्पादनाला पाहिजे तसा दर मिळत नाही. कृषीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी नैराश्यात जातो. या कृषी मालाचा उपयोग ईथेनॉल, जैव इंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृध्द होईल. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांसाठी गटशेतीचे महत्व विषद केले. ते म्हणाले, गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी एकाच वेळी सामुहिकरित्या कीडीचे योग्य व्यवस्थापन करुन उत्पादन वाढवू शकतो. शेतकऱ्यांना मदतनीस ठरावे, यासाठी शासनाच्या वतीने कृषी मित्र, कृषी सखी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहेत. तसेच सोयाबिन आणि कापूस पीकासाठी महाकॉट व महासोयाबिन हा प्रकल्प राबविल्या जात आहेत. शेतीतील कीड नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा व फवाऱ्यांचा मारा न करता कडूनिंबाची झाडे लावून त्याचा अर्क फवारणीसाठी वापरण्यात येत आहेत. यासाठी नीमपार्क विकसित केल्या जात आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी भवन निर्माण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी केला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ऑरगॅनिक हॉल्टीकल्चर’ या पुस्तकाचे तसेच कृषी क्षेत्रातील घडी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले. संचालन श्रीमती सीमा निंबाते तर आभार कृषी विकास व संशोधनचे अध्यक्ष डॉ. एस.आर. पोटदुखे यांनी मानले.