Published On : Sun, Sep 15th, 2019

वीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

सर्व संघटनांतर्फे सत्कार कार्यक्रम 2035 च्या तयारीला लागा, मेहनतीनेच कंपनी मोठी होणार

नागपूर: वीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य आहे. ज्या राज्यात, देशात प्रतिव्यक्ती वीजवापर अधिक आहे, अशा देशांना प्रगत देश समजले जाते. तसेच भविष्यात पेट्रोलचा वापर अत्यंत कमी होऊन विजेचा वापर वाढणार आहे, त्यामुळे आपल्याला आजच्यापेक्षा अधिक वीजनिर्मिती करावी लागणार आहे आणि मेहनतही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनी मोठी होईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कोराडी येथील औष्णिक वीज केंद्राच्या सर्व संघटनांतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या सत्काराचे आयोजन पगारवाढीनिमित्त करण्यात आले होते. पण हा सत्कार न स्वीकारता बावनकुळे यांनी साधा पुष्पगुच्छ स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अभियंता राजेश पाटील, मुख्य अभियंता तासकर, देवतारे, न.प.अध्यक्ष राजेश रंगारी, सुपे, रोकडे, अश्विनी वानखेडे, सविता ढेंगे, धकाते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करणारे भाषण करताना सांगितले की, महाराष्ट्रापेक्षा मोठा प्रदेश असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त 15 हजार मेगावॉट वीज दररोज लागते. महाराष्ट्रात मात्र 25 हजार मेगावॉटपर्यंत मागणी झाली आणि आपल्या तीनही कंपन्यांनी ती कोणत्याही अडचणीशिवाय पारेषित केली. याचा मला अभिमान आहे. हा गौरव कंत्राटी कामगारांपासून सर्वांचा आहे. पण 2035 मध्ये 35 ते 40 हजार मेगावॉट वीज लागणार आहे. त्यामुळे अधिक वीज निर्मितीची तयारी करावी लागणार आहे. यासाठी आपण जुने संच बदलून त्याच ठिकाणी नवीन दोन संच सुपर क्रिटिकल सुरु करणार आहोत. दिवाळीनंतर त्याचे भूमिपूजन होऊन काम सुरु होणार आहे. या संचासाठी आपल्याला कुणालाही पैसा मागण्याची गरज नाही. सर्व व्यवस्था झाल्या आहेत.

पंतप्रधान मोदी, पियुष गोयल आणि आर के सिंग या केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्राला खूप सहकार्य लाभले आहे. अपारंपरिक ऊर्जेला अधिक प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारचे आहे. त्यामुळे शासनाच्या प्रयत्नांनी 7 रुपये युनिट दराची सौर ऊर्जा आता 2 रुपये 63 पैसे युनिटवर आली आहे. 365 पैकी 328 दिवस सूर्याची उष्णता आपल्याला उपलब्ध असल्यामुळे सौर ऊर्जेचा अधिक वापर करावा लागणार आहे. राज्यातील सर्व शेतकर्‍यांना आपण सौर ऊर्जेचे कनेक्शन देत आहोत. 42 लाख शेतकर्‍यांना 5 वर्षापासून 10 तास वीज आपण पुरवीत आहोत. 27 हजार कोटी थकबाकी असतानाही एकाही शेतकर्‍याचे कनेक्शन कापण्याचे पाप या शासनाने केले नसल्याचेही ऊर्जामंत्री म्हणाले.

पॉवर स्टेशनमध्ये काम करताना आपल्या चुकीमुळे कुणाचाही जीव जाईल अशी चूक करू नका असे आवाहन करीत ऊर्जामंत्र्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा. 8 तास मनलावून काम करा. संवेदनशीलता असली पाहिजे. कर्मचारीच कंपनीचे चालक मालक आहे, हे लक्षात घेऊन पीएलएफ वाढवा असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

याप्रसंगी मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी पगारवाढ झाली, त्याप्रमाणेच जबाबदारीही वाढली असल्याची जाणीव कर्मचार्‍यांनी ठेवावी असे सांगत अभियंता दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.