Published On : Fri, Jun 18th, 2021

‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार

Advertisement

– महापौरांनी घेतला मंजूर प्रकल्पांचा आढावा : उद्यान, सोसायट्या, खुल्या जागांवर होणार वृक्षारोपण : पूर्व आणि उत्तर नागपूर मध्ये जास्त भर

नागपूर : नागपूर शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. विशेष करुन पूर्व नागपूर आणि उत्तर नागपूरात वृक्षारोपण करुन तिथल्या नागरिकांना प्रदूषणापासून मुक्त करणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनानी यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे स्पष्ट निर्देश महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाच प्रकल्प आणि १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत आखलेल्या १३ कलमी कार्यक्रमानुसार नागपुरातील हरित क्षेत्र वाढविण्यात येणा-या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन झाले असून मंजूर प्रकल्पाचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

महापौर कक्षात गुरुवारी (ता. १७) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., मनपाचे आरोग्य सभापती संजय महाजन, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगररसेवक सुनील अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महेश मोरोणे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, विभागाच्या कार्यकारी अभियंता (पर्यावरण) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, नोडल अधिकारी स्वच्छ भारत मिशन डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वयंसेवी संस्थेच्या लिना बुधे उपस्थित होत्या.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार ‘निरी’ने नागपूर शहराचा प्रारूप वायु प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्रिसदस्यीय समितीच्या शिफारसीनुसार कृती आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सहा प्रकल्पांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी पाच प्रकल्प नागपूर महानगरपालिका राबविणार असून त्यासाठी ५.८५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत ६६ कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून यापैकी ३३ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. याअंतर्गत १३ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला असून नागपूर शहराचे हरित क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

महापौरांनी नागपूरात ७५ ऑक्सीजन झोन तयार करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश दिले. तसेच पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, नीम चे वृक्ष लावणे, सिमेंट रोडचा रस्ते दुभाजक, बर्डी उडडानपुलाचा खाली सुध्दा वृक्षारोपण करण्याचे त्यांनी सूचित केले. त्यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या ए.बी.डी. क्षेत्रात रमन साईंस सेंटरच्या धर्तीवर गणितावर आधारित उद्यान विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. एका रस्त्यावर एका प्रकारचे वृक्ष लावले तर सुंदर दिसेल, अशी सूचना ही त्यांनी केली.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत जे सहा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे त्यामध्ये तीन ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी संयत्र, वाहतूक मार्गिकेत हरित क्षेत्र, शहरातील उद्यानात बागायती पालापाचोळ्याची विल्हेवाट लावणे (लता मंगेशकर उद्यान, दयानंद पार्क), शहरातील वायू प्रदूषणाबाबत जनजागृती व क्षमता बांधणी कार्यक्रम, यांत्रिक रस्ते सफाई करिता यंत्रचलित दोन वाहने आणि तीन वॉटर स्प्रिंकलर यांचा समावेश आहे. यापैकी हवा गुणवत्ता तपासणी संयंत्र हा प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून १३ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची नियमित स्वच्छता करणे, उद्यान, सार्वजनिक ठिकाणे, हाऊसिंग सोसायटी, शाळा आदी ठिकाणी हरित क्षेत्राची निर्मिती करणे, वाहतूक स्थळे, रस्ते दुभाजक, वाहतूक जंक्शन या ठिकाणी झाडे लावणे, वाहतूक जंक्शन आणि सिग्नल्सचा विकास करणे, जयताळा येथे ग्रीन क्रिमटोरिया, तेथे हरित क्षेत्र निर्माण करणे, पाच उद्यानांचा विकास, क्रिमेटोरियासाठी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारणे, सुकर वाहतुकीसाठी खड्डेविरहित रस्ते ठेवणे, बायोडायव्हर्सिटी पार्क, टेकडीवर वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

हा एक उत्तम कार्यक्रम असून मंजूर प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करा. अन्य विभागांशी समन्वय साधून अंमलबजावणीचे नियोजन करा, असे निर्देशही महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आखण्यात आलेल्या कार्यक्रमांचे आणि प्रकल्प अंमलबजावणीचे संपूर्ण नियोजन तयार असून प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदारींचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असा विश्वास आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी मांडलेल्या सूचनांचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement