Published On : Fri, Jun 18th, 2021

कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, गाव पातळीवर गटांना मार्गदर्शन

नागपूर : पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी व सहज शक्य असणारा ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांनी राबवावा, या प्रयोगातून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या संदर्भात एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी विभाग, आत्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, व्हीएसटीएफ व जिल्हा यंत्रणेतील अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी समाविष्ट होते. अधिकारी कर्मचारी आजचे प्रशिक्षण घेऊन ग्रामपातळीवरील शेतकरी गटांना यासंदर्भात प्रशिक्षित करणार आहे. कीडनियंत्रणासाठी प्रभावी ठरलेल्या ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी राबवावा, यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे.

आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. नलिनी भोयर, रिजनल सेंटर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सेंटर नागपूरचे उपसंचालक डॉ. ए. के. बोहरिया, तांत्रिक अधिकारी प्रल्हाद कोल्हे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विकास इलमे, कृषी विकास अधिकारी वंदना भेले, कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर, आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी टायकोग्रामाच्या उपयुक्ततेची माहिती दिली. यावर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ही त्यांनी सांगितले. ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक आहे. तो अडीवर्गीय कीटकांचे अंडे नष्ट करतो. टायकोग्रामाचा सूक्ष्म किडा शेतात फिरून बोंड अळ्याचे अंडे शोधून काढतो. किडीतील अंड्यामध्ये स्वतःची अंडी टाकतो. त्यामुळे किडींची नवीन अवस्था तयार होत नाही. ही प्रक्रिया उपयोगी ठरली आहे. याचा वापर अधिक प्रमाणात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विभागीय मध्यवर्ती कीड व्यवस्थापन केंद्राचे तांत्रिक अधिकारी प्रल्हाद कोल्हे यांनी यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना टायकोग्रामाचे प्रशिक्षण दिले.

शेतकऱ्यांनी गाव पातळीवर लवकरच सुरू होणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन, त्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी दिले. तर प्रकल्प संचालक नलिनी भोयर यांनी जिल्ह्यामध्ये उद्दिष्ट घेऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी काम करावे, असे आवाहन केले.