Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Sep 19th, 2020

  विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याची राज्यपालांची सूचना

  बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली.

  जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित बांबू मिशन अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, यावेळी पणजी, गोवा येथील राजभवन येथून उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

  बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. शेतजमीन, जंगल तसेच पहाडी प्रदेश कोठेही बांबू लागवड होते. पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचा घटक असलेल्या बांबूपासून टोपली, फर्निचर, वस्त्र, दाग-दागिने, राखी यांसह अनेक वस्तू तयार होतात. जीवनाच्या आरंभापासून तर थेट अंत्ययात्रेपर्यंत बांबू माणसाला उपयुक्त असणारी वस्तू असल्याचे सांगून विद्यापीठांनी आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांनी ग्रामीण जनतेला बांबू लागवड तसेच बांबू पासून तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्यासाठी मदत करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

  विद्यापीठातील प्राध्यापकांनी केवळ अध्यापनाचे कार्य न करता समाजाला देखील आपले योगदान दिले पाहिजे असे सांगून विद्यापीठांनी बांबू मिशनला आपले मिशन बनवून यशस्वी करून दाखवावे असे त्यांनी आवाहन केले.

  केंद्र सरकारने बांबू मिशन सुरु करून सन २०१७ साली बांबूला वृक्ष न मानता गवत मानावे या दृष्टीने विधेयक पारित केले आहे. सदर विधेयकामुळे वनवासी व आदिवासी लोकांना बांबूचा उपजीविकेसाठी उपयोग करता येऊ लागला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

  ‘राजभवन येथे बांबू फर्निचर’
  गोवा येथील काबो निवास राजभवन ४५० वर्षे जुने असून या ठिकाणी बांबूचा विविध ठिकाणी उपयोग केलेला आहे. मुंबई येथील राजभवन येथे नवी वास्तू तयार होत असून त्या ठीकाणी फर्निचर घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र राजभवन येथे केवळ बांबूपासून तयार केलेलेच फर्निचर घ्यावे अशी सूचना आपण केली असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

  चर्चासत्राला कुलगुरु डॉ पी पी पाटील, प्र-कुलगुरू पी पी माहुलीकर, धडगाव, जि. नंदुरबार येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंत वळवी, प्रो बी व्ही पवार, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंके यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, निमंत्रित वक्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145