अवंतिका लेकुरवाळे यांच्या उपोषणाला यश, ‘आमरण उपोषण’ मागण्या पूर्ण करूनच सोडण्यात आले
कामठी:-. ४ सप्टेंबर पासून प्रा. अवंतिका लेकुरवाळे व दिनेश ढोले सहकारी शेतकऱ्यांसह उपोषणावर बसले होते. त्यासमर्थनात गावोगावी कॅन्डल मार्च, जागोजागी रस्ता जाम करून शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला वेठीस धरले. कामठी, कुही व मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आंदोलनास पाठींबा दिला. तसेच अनेक संघटनांमार्फत या आमरण उपोषणास समर्थन जाहीर करण्यात आले त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, प्रदेश कॉंग्रेस कमेटी, प्रहार जनशक्ती संघटना कुही व कामठी, बहुद्देशीय तिरीळे कुणबी संघ नागपूर, खैरे कुणबी संघटना, जनमंच, नागपूर जिल्हा महिला कॉंग्रेस कमेटी, नागपूर जिल्हा किसान कॉंग्रेस कमेटी, महाविदर्भ जनजागरण, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस, नागपूर जिल्हा सरपंच सेवा संघ, कामठी तालुका कॉंग्रेस कमेटी, शिवसेना कामठी व मौदा तालुका, अन्न दिप भव प्रसारक मंडळ कामठी तालुका, मौदा तालुका कॉंग्रेस कमेटी, जन सुराज पार्टी, ऑल इंडिया सत्यशोधक वूमन फेडरेशन, विदर्भ राज्य संघटना, व शेतकरी संघटना होत्या. अशा अनेक संघटनांनी पाठींबा देऊन सहभागी झाल्या. शेतकरी हजारोच्या संख्येने आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याने शेवटी सरकारला नमावे लागले. आणि त्यामुळे दि. ७ सप्टेंबर ला सायंकाळी ७ वाजता प्रशासनामार्फत आंदोलनकर्त्यांना मनपा कार्यालय येथे चर्चा करण्याकरिता बोलावण्यात आले.
आंदोलनकर्त्यांकडून चर्चा करण्याकरिता एक शिष्टमंडळ पाठविण्यात आले त्याचे नेतृत्व सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी केले. तर शिष्ट मंडळामध्ये माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, विरोधी पक्ष नेता तानाजी वणवे, रमेश लेकुरवाळे, तापेश्वर वैद्य, पुरुषोत्तम शहाणे, देवेंद्र गोडबोले, दिनेश ठाकरे व अनुराग भोयर हे होते. या शिष्ट मंडळासोबत मा. उर्जामंत्री महा.राज्य, मनपाचे मा. आयुक्त व उपायुक्त, उपविभागीय अधिकारी मौदा व तहसीलदार कामठी यांनी चर्चा केली.
चर्चेअंती मान्य करण्यात आलेल्या मागण्या:
आजच पोहरा नदीचा बांध तोडून पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. व पुन्हा तो बांध नदीवर न बांधण्याचे कबुल करण्यात आले.
NTPC ला देण्यात येणारे पाणी हे आगरगाव समोरील पानमारा येथून देण्याचे मान्य करण्यात आले.
आगरगाव समोरील पानमारा येथे ट्रीटमेंट प्लांट बांधण्याचे मान्य करण्यात आले.
नागनदीचा थर्मल पावर स्टेशन सोबत झालेला करार रद्द करण्याची मागणी अंशत: मान्य केली. नागनदीचा ३३० MLD चा थर्मल पावर स्टेशन सोबत करण्यात आलेल्या ३० वर्षाच्या करारामध्ये शेतकऱ्यांना नागनदीचे पाणी अपुरे गेल्यास आवश्यक अल्पावधीसाठी थर्मल पावर स्टेशनचे पाणी कमी करायचे आणि शेतकऱ्यांना प्रथम पाणी द्यायचे यासंबंधी करारात सुधारणा करणारा प्रस्ताव हा मनपा द्वारा शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित राखण्याविषयी बाबी समाविष्ट केल्या जातील.
मा. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधित्व करत मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी दिलेल्या आश्वासनाने संतुष्ट झाले का? उपोषण सोडायचे कि सुरूच ठेवायचे? हे शेतकऱ्यांना विचारले. शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्यास होकार दिल्यानंतरच उपोषण सोडण्यात आला. आमरण उपोषणकर्ते प्रा. अवंतिका लेकुरवाळे व दिनेश ढोले यांनी उपोषण सोडन्यापुर्वी ‘शेतकऱ्यांना शेतीला पाणी सिंचन करतांना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झालास पुन्हा तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल’ असा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.
सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार, नागपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक आणि माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. प्रसंगी जि.प. नागपूरचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, महिला कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा तक्षशीला वाघदरे, कृषी उत्पन्न बाजार समिती कामठीचे सभापती हुकुमचंद आमधरे, मनपाचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, कॉंग्रेसचे उमरेड विधानसभा प्रमुख डॉ. संजय मेश्राम, पुरुषोत्तम शहाणे माजी सभापती जि.प., कामठी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना कंबाले, पुरुषोत्तम हजारे नगरसेवक पारडी, तापेश्वर वैद्य, देवेंद्र गोडबोले, ज्ञानेश्वर वानखेडे तालुका अध्यक्ष मौदा कॉंग्रेस, राजेंद्र लांडे, राजेश काकडे अध्यक्ष जन सुराज्य पार्टी, नितीन रोंगे विदर्भवादी संघटनेचे नेते, सुधीर पालीवाल, बेलेकरताई, ज्योती झोड, संघपाल मेश्राम, परमेश्वर राऊत, अनुराग भोयर आंदोलनस्थळी उपस्थित होते.
हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता अतुल बाळबुधे, आशिष मल्लेवार, विजय खोडके, निरंजन खोडके, गणेश महाल्ले, परमेश्वर चिकटे, बबनराव खुळे, अतुल डोईफोडे, राजूभाऊ शहाणे, मनोज कुथे, ललित वैरागडे, गणपत वानखेडे, सुधीर शहाणे, अजय इंगोले, संजय ठाकरे, प्रभाकर हूड, विनोद शहाणे, रमेश विघे, नानाभाऊ वाघ व अनेक शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.
संदीप कांबळे कामठी