Published On : Tue, Nov 13th, 2018

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार चालढकल करत आहे – अजित पवार

मुंबई : गेली चार वर्षे या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या खेळवत ठेवल्या आहेत. गेले १२ दिवस मराठा समाजाचे तरुण आझाद मैदानात उपोषण करत आहेत पण सरकारने याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणूनच हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आम्ही या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका घेणार आहोत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी मिडियाशी बोलताना जाहीर केली.

मराठा समाजाचे तरूण गेले १२ दिवस मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आज अजितदादा पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार विदयाताई चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव उपस्थित होते.

मराठा समाजाने यावर्षी काळी दिवाळी साजरी केली. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजावर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शिवाय अजितदादा पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजयं मुंडे यांनी विनाअनुदानित उच्चमाध्यमिक प्राध्यापकांच्या उपोषणस्थळी भेट दिली.त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारतानाच त्यांच्या मागण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन तात्काळ त्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी दादांना आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धन्यवाद दिले.