Published On : Thu, Mar 19th, 2020

मनपाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली

Advertisement

‘कोरोना’मुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय

नागपूर : नागपूर महानगरपालिकेची २० मार्च रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित सर्वसाधारण सभा ‘कोरोना’मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मनपातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १९) आयोजित सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांची उपस्थिती होती.

नागपूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असल्याने पाच व्यक्तींच्या वर एकत्र जमाव करता येत नाही. शहरातील मॉल, जिम, बिअर बार, वाईन शॉप, हॉटेल आणि रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.

दरम्यान, २० मार्च रोजी नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली तर तेथे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांसह शेकडो व्यक्ती एकत्र येणार होते. तसे झाल्यास कोरोना संसर्गाची शक्यताही बळावू शकते. यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांना एक पत्र देऊन सभा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून सर्वसंमतीने शुक्रवार २० मार्च रोजीची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सर्व निर्बंध उठल्यानंतर सभेची पुढील तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.