Published On : Thu, Mar 19th, 2020

थुंकणाऱ्यांकडून केला पाच हजारांचा दंड वसूल

मनपाच्या उपद्रव शोध पथकाची संविधान चौकात कारवाई

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राहावी, यासाठी सर्वस्तरावर जनजागृती होत असताना काही नागरिक मात्र आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. अशा नागरिकांच्या सवयीवर वचक बसविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम चालवित काही तासांतच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करु नये, या शब्दात बजावले.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मेंढे यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात धरमपेठ आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या चमूने ही कारवाई केली. शहरातील रस्त्यांवर थुंकल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रसार अधिक होतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शहरातील प्रशासकीय यंत्रणा याबाबत अधिक सतर्क आहे. थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कंबर कसली आहे. याअंतर्गत गुरुवारी (ता. १९) संविधान चौकात कारवाई करण्यात आली.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील प्रवासी, स्टार बसमधील प्रवासी, ऑटो चालक, कार चालक, ट्रकचालक अशा विविध २४ व्यक्तींनी रस्त्यावर थुंकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत प्रति व्यक्ती २०० याप्रमाणे ४६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गाडीतूनच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार व्यक्तींवरही पथकाने कारवाई केली. प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन्ही कारवाईतून एकूण पाच हजार रुपये उपद्रव शोध पथकाने वसूल केले असून १ मार्च ते १८ मार्चपर्यंत सुमारे २०४ थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. वसूल केलेल्या दंडाची रक्कम ४०,२०० रुपये इतकी आहे.