Published On : Fri, Apr 10th, 2020

कोविड-१९चा पाचवा रुग्ण उपचारानंतर घरी परतला

नागपूर : दिल्लीवरून आल्यानंतर कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेला नागपुरातील पाचवा रुग्ण आज पूर्णपणे बरा होउन घरी परतला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि तेथून निरोप दिला.

नागपूर शहरासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस सकारात्मक ठरला. १७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेले खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीला २२ मार्च रोजी अस्वस्थ वाटू लागले. प्राथमिक उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली नसल्याने २५ मार्च रोजी ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाचणीसाठी गेले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेत त्यांचे ‘स्वॅब’ चाचणीकरीता पाठविण्यात आले होते. २६ मार्च ला प्राप्त चाचणी अहवालानुसार त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शुक्रवारी (ता.१०) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.


इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, खामला येथील कोरोनाबाधीत असलेले रुग्ण पूर्णत: बरे झाले असून ते आता सुदृढ आहेत. मधुमेहाचा त्रास असतानाही त्यांनी उपचाराला दिलेली साथ, रुग्णालय प्रशासनाने घेतलेली काळजी आणि शासनाच्या दिशानिर्देशानुसार केलेल्या उपचारामुळे हे शक्य झाले आहे. मात्र पुढील १४ दिवस त्यांना ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. या रुग्णाला सुट्टी मिळाल्यानंतर आता मेयो रुग्णालयात केवळ आठ रुग्ण असून या रुग्णाच्या संपर्कात आलेले इतर रुग्णही बरे झाले असून त्यांना शनिवारी सुट्टी होण्याची शक्यता आहे.

रुग्णाने मानले आभार
पूर्णपणे बरे होउन घरी परतलेले खामला येथील रुग्ण यांनी कोरोनाशी लढा देणा-या आणि त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे तसेच संपूर्ण रुग्णालय कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जे सहकार्य केले त्याबद्दलही त्यांनी भावनिक होउन आभार मानले. कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. वेळीच उपचार घ्या, प्रशासनाला सहकार्य करा आणि घरी बसून एकत्रितपणे कोरोनाविरुद्ध लढा, असे आवाहनही त्यांनी केले.