Published On : Fri, Apr 10th, 2020

नदी स्वच्छतेसोबतच नाला स्वच्छतेलाही सुरुवात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : २२७ नाल्यांचा समावेश

नागपूर: शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

नाला सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.

सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरू नगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.


नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२. धरमपेठ झोनमध्ये ३५, हनुमाननगर झोनमध्ये १४, धंतोली झोनमध्ये १४, नेहरु नगर झोनमध्ये १५, गांधीबाग झोनमध्ये ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज झोनमध्ये सात, आशीनगर झोनमध्ये १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.