Published On : Mon, May 7th, 2018

‘बिन चेहऱ्याची माणसं’ पुस्तकात समाजाच्या संवेदना – मुख्यमंत्री

मुंबई : पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकातून समाजाच्या संवेदना प्रकट होत आहेत. ज्यातील शब्द, घटना, चित्रे आणि अक्षरेही बोलतात, असे हे अनोखे पुस्तक आहे. लेखन, चित्रकला आणि सुलेखनकला यांचा सुरेख संगम या पुस्तकात झाला आहे. शिवाय हे पुस्तक ई – आवृत्ती आणि ऑडिओ बुकच्या स्वरुपातही उपलब्ध झाल्याने मराठी साहित्यातील तो एक वेगळा प्रयोग ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

दै. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘बिन चेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाच्या ई – आवृत्ती आणि ऑडिओ बुकचेही प्रकाशन करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, बुकगंगा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सुलेखनकार अच्युत पालव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार श्री. अतुल कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या संवेदना आणि त्यांची स्पंदने टिपली आहेत. फार कमी शब्दात मोठा आशय, संवेदना आणि भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक कथेवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतके महत्वाचे विषय त्यांनी यात मांडले आहेत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, मुंबई हे फार वेगळे शहर आहे. इथली पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यामध्ये संवेदनशीलता अजूनही टिकून आहे. पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकातून याचीच प्रचिती दिली आहे. या पुस्तकात एका संवेदनशील पत्रकाराचे मन पहायला मिळते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

पुस्तकाचे लेखक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी पुस्तक लेखनाचा आपला प्रवास सांगितला. मुंबई शहरात जाती-धर्म-प्रांत यांच्या पुढे जाऊन अनेक बिन चेहऱ्याची माणसे राहतात. या लोकांचा जगण्याचा संघर्ष प्रचंड आहे. राजकारण, समाजकारण याच्या पुढे जाऊन त्यांचे स्वत:चे असे प्रश्न असतात. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून या लोकांचा संघर्ष आणि त्यांचे प्रश्न समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी श्री. पृथ्वीराज चव्हाण, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, मंदार जोगळेकर, प्रकाश जोशी, अच्युत पालव यांचीही भाषणे झाली.