Published On : Tue, Oct 3rd, 2017

कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : महापौर नंदा जिचकार

नागपूर: कुठल्याही परिस्थितीत मनपातील कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. मनपा कर्मचारी संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, स्थापत्य समिती व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती चेतना टांक, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक पिंटु झलके, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धिकी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते.

जुलै महिन्यात संघटनेचे शिष्टमंडळ महापौरांना भेटले होते. संघटनेच्या मागण्यांच्या अनुषंगाने त्यावेळी महापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार अद्याप कार्यवाही झाली नाही. ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर बोलताना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू, असे आश्वासन दिले.

सहाव्या वेतन आयोगाची व ५९ महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याबाबत चर्चा करताना महापौर म्हणाल्या, मनपासमोर एक आर्थिक पेच निर्माण झाला आहे. थकीत मालमत्ता कर वसुली झाली की कर्मचाऱ्यांची थकबाकी अदा करता येईल. यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नरत रहावे. संघटनेनेही पुढाकार घेऊन कामगिरी दाखविली तरच दिवाळीपूर्वी महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असा विश्वास संघटनेच्या प्रतिनिधींना त्यांनी दिला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे यांनी महापालिकेच्या मासिक आर्थिक ताळेबंदाचे वाचन केले.

मनपाच्या श्रेणी ४ व ३ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची तसेच शिक्षित सफाई कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सफाई कामगारांना नियमानुसारच पदोन्नती देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्याला कामावर रूजू करण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर त्याला कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी संघटनेचे महासचिव डोमाजी भडंग, कोषाध्यक्ष ओंकार लाखे, संघटनमंत्री रितेश काशीकर, उपाध्यक्ष अरूण मोगरकर, सचिव सुनील तांबे, पुष्पा बुट्टे, मीना नकवाल, सुषमा राठोड, सुधीर फटींग, विशाल शेवाळे, गजानन जाधव उपस्थित होते.