नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विधी विशेष समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात मंगळवारी (ता. ३) पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीचे सदस्य महेश महाजन, अभिरुची राजगिरे, जितेंद्र घोडेस्वार, मनपाचे अभियोक्ता व्ही.डी. कपले, बाजार अधीक्षक दिनकर उमरेडकर, स्थावर विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक राजेश सोनटक्के उपस्थित होते. सदर बैठकीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत सेक्शन ८१-ब अंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत नियमावली करण्यासंदर्भात बाजार विभाग व स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती नियमावली तयार करण्याचे निर्देश सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी दिले. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना न्यायालयात साक्ष कशी द्यावी, कायद्यातील कलमांचा योग्य वापर कसा करावा व अन्य कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे निर्देशही सभापती श्रीमती तेलगोटे यांनी विधी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत आयुक्तांनी खासगी रस्त्यांबाबत नोटीफिकेशन काढून त्यांना सार्वजनिक म्हणून घोषित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.