Published On : Tue, Oct 3rd, 2017

महानिर्मिती प्रेसनोट ३ ऑक्टोबर २०१७

Advertisement

नागपूर : पर्यावरण नियमांचे पालन केवळ संविधानिक तरतूद म्हणून न करता त्याची स्वत:हून काळजी घेतल्यास, ‘स्मार्ट गोल’ चे ध्येय ठेवून, सामाजिक जबाबदारी जोपासत अधिक चांगले पर्यावरण व्यवस्थापन करता येऊ शकते असा विश्वास अध्यक्षीय भाषणातून बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केला. त्यांनी जागतिक पातळीवरील वातावरणातील बदल, देशांतर्गत पावसाचा असमतोल, वीज केंद्रात शून्य पाणी निसरा, राख व्यवस्थापन, वीज केंद्र परिसरातील ग्रामीण भागात २४ बाय ७ ई-पाणपोई इत्यादी विषयांवर महत्वपूर्ण विचार व्यक्त केले.

महानिर्मितीच्या विद्यमाने औष्णिक विद्युत केंद्रातील पर्यावरण व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय हरित लवादाचे माजी सदस्य डॉ.अजय देशपांडे, डॉ.विद्यानंद मोटघरे सह संचालक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, दत्तात्रय देवळे निवृत्त मुख्य विधी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

डॉ.अजय देशपांडे म्हणाले कि, पर्यावरणाच्याबाबत महाराष्ट्र राज्याने कायम पुढाकार घेतला आहे. दिवसागणिक पर्यावरण विषयक नियम अधिक कठोर होत असल्याने या क्षेत्रात संशोधन कार्य, प्रो-अॅकटीव भूमिका, नवनवीन कल्पना अंमलात आणाव्या लागतील. वीज केंद्रात प्रत्येक काम करताना त्याविषयीची पर्यावरणपूरक बाजू ध्यानात ठेवूनच कामे करायला हवीत. स्थानिक कायद्यांसोबतच वैश्विक कायद्यांची माहिती देखील ठेवणे गरजेचे झाले आहे. पर्यावरण विषयक नवीन शासन नियम व संस्थांकरिता संरक्षण पद्धती या विषयावर त्यांनी संगणकीय सादरीकरण केले व उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन देखील केले.

डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी उद्योगांसाठी स्टार रेटिंग हि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नवी संकल्पना संगणकीय सादरीकरणाद्वारे विषद केली. महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव यांनी सांगितले कि, पर्यावरणाचे संरक्षण करण्याकरीता वीज केंद्राच्या मनुष्यबळाने अधिक सजग राहणे गरजेचे आहे तर संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे म्हणाले कि, मानव आणि निसर्ग यामधील परस्पर संबंध दुरावल्यानेच आता त्याचे व्यवस्थापन करायची वेळ आली आहे. पुढच्या पिढीला स्वच्छ व सुंदर वातावरण उपलब्ध करण्यासाठी आज उपाययोजना करण्याची खरी गरज आहे व त्यादृष्टीने हि कार्यशाळा निश्चितच दिशादर्शक ठरेल असे मत व्यक्त केले. यानंतर ‘पर्यावरण विषयक कायदे एक दृष्टीक्षेप’ यावर दत्तात्रय देवळे, औष्णिक वीज केंद्रातील वायू दर्जा व्यवस्थापन यावर नागपुरातील निरी संस्थेच्या शास्त्रज्ञ पद्मा राव, औष्णिक वीज केंद्राकरिता सांडपाणी पुन:प्रक्रिया व्यवस्थापन या विषयावर नीरीचे डॉ.एन.एन.राव यांनी अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले. सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेबद्दल उस्त्फुर्त मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी, कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे स्वागतपर भाषणानंतर प्रास्ताविकातून डॉ.नितीन वाघ यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका विषद केली. कार्यशाळेचे सूत्र संचालन प्रवीण बुटे यांनी तर आभार प्रदर्शन कैलाश चिरूटकर यांनी केले. कार्यशाळेला महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, विनोद बोंदरे, प्रदीप शिंगाडे, महाजेम्स्चे सुधीर पालीवाल, महानिर्मितीचे मुख्य अभियंते अभय हरणे, राजेश पाटील, जयंत बोबडे, राजकुमार तासकर,प्रकाश खंडारे,पंकज सपाटे, अनंत देवतारे, रवींद्र गोहणे,संजय मारुडकर,प्रमोद नाफडे, सुनील आसमवार,मुख्य महाव्यवस्थापक नितीन चांदुरकर, कंपनी सचिव राहुल दुबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी तसेच राज्यभरातील महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत केंद्रातील अभियंते, रसायनशास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.