Published On : Fri, Jan 3rd, 2020

‘खाऊ गल्ली’चे उद्घाटन ९ जानेवारीला

महापौर संदीप जोशी यांनी केला पत्रकारांसोबत पाहणी दौरा

नागपूर : शहरावासीयांसाठी बहुप्रतिक्षित ठरलेल्या ‘खाऊ गल्ली’चे काम अखेर पूर्ण झाले असून येत्या ९ जानेवारी २०२०ला सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री ना.श्री.नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते खाऊ गल्लीचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

शुक्रवारी (ता.३) महापौर संदीप जोशी यांनी शहरातील वृत्तपत्र व माध्यमांच्या प्रतिनिधींसह ‘खाऊ गल्ली’चा पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, धंतोली झोन सभापती लता काडगाये, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी स्थायी समिती सभापती सुधीर (बंडू) राऊत, मनोज साबळे आदी उपस्थित होते.

९ जानेवारी २०२० ला होणा-या ‘खाऊ गल्ली’च्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री सर्वश्री ना. नितीन राऊत, ना.अनिल देशमुख, ना.सुनील केदार, खासदार डॉ.विकास महात्मे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार सर्वश्री नागो, गाणार, प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे, अनिल सोले, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत, असेही महापौरांनी सांगितले.

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत बालभवन उद्यानामध्ये ‘खाऊ गल्ली’च्या संदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या होत्या. त्यावर गांभीर्याने सर्वांनी एकत्र येत केलेल्या कार्याचे फलीत म्हणून आज ‘खाऊ गल्ली’चे सर्व आवश्यक काम पूर्ण झाले आहे. माजी स्थायी समिती सभापती सुधीर (बंडू) राउत यांच्या संकल्पनेतून गांधीसागर तलाव परिसरात ‘खाऊ गल्ली’ तयार करण्यात आली आहे. ‘खाऊ गल्ली’मध्ये येणा-या नागरिकांसाठी बालभवनच्या परिसरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून ‘पे अँड पार्क’बाबत निविदा प्रक्रिया ६ जानेवारीला पूर्ण होणार आहे. ‘खाऊ गल्ली’मध्ये स्टॉलसाठीच्या निविदा प्रक्रियेमध्ये ७८ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातून ३२ जणांची निवड केली जाणार आहे. ‘खाऊ गल्ली’मध्ये आणखी नवीन ८ स्टॉल्सबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘खाऊ गल्ली’मध्ये येणा-या नागरिकांची गर्दी लक्षात घेता रमन विज्ञान केंद्रासमोरील रस्ता सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजता दरम्यान बंद ठेवण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांकडून केली जात आहे. याबाबत आवश्यक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. नागपूरातील महत्वाकांक्षी बहुप्रतिक्षित प्रकल्प अखेर पूर्णत्वास येत आहे, ही आनंददायी बाब आहे. शहरातील इतरही झोनमध्ये असे प्रकल्प राबविण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.