Published On : Sat, Jul 13th, 2019

भक्तीरंग कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध

आषाढी एकादशीच्या दिवशी “माझे माहेर पंढरी “या सारख्या गीताने वातावरण झाले भक्तिमय

रामटेक: आषाढी एकादशी निमित्य स्थानिक गांधी चौकातील परमानंद स्वामी मठ विठ्ठल मंदीरात आयोजित भक्तीरंग कार्यक्रमात उपस्धित श्रोते आध्यात्मिक वातावरणात रंगून मंत्रमुग्ध झाले.

साईराम भजन मंडळ द्वारा सादरीकरण करण्यांत आलेल्या या कार्यक्रमात एकापेक्षा एक विठ्ठल भक्तीगीतांची मेजवाणी देण्यात आली. मठाचे संचालक पुजारी कमलाकर मुलमुले यांनी कलावंतांचे स्वागत केले . रामटेक येथील प्रसिद्ध गायक अमोल गाडवे यांनी विठ्ठल गीतांचे सादरीकरण केले.विठ्ठल आवडी प्रेमभाव,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा,माझे माहेर पंढरी, अबिर गुलाल यासारख्या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले.

कार्यक्रमात मनोहर राऊत यांनी संवादिनीवर तर प्रसिद्ध तबलावादक प्रशांत जांभुळकर यांनी तबल्यावर,धीरज राऊत यांनी मृदंगावर तोलामोलाची साथ दिली. ईश्वर हांडे,विनोद जोशी यांनी सहगायक व तालवाद्यावर सुरेख साथसंगत केली. माझा देव पंढरी या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप करण्यांत आला. आषाढी एकादशीनिमित्य विविध मंदीरात भजन संकिर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले होते.
Attachments area