Published On : Mon, Aug 26th, 2019

खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल – राज्यपाल चे. विद्यासागर राव

Advertisement

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथे केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन करताना ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कॉफी टेबल बुकसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात.

श्री. सहारिया म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. या पुस्तकात त्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे.

श्री. कुरूंदकर यांनी कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनासंदर्भातील भूमिका मांडली व शेवटी आभार प्रदर्शन केले. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.