विदर्भात कोरोनाचा कहर, नागपुरात हजारोंना रोज लागण, शासनाचा नाकर्तेपणा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
-मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी

नागपूर: संपूर्ण विदर्भात कोरोनाचा कहर झाला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, खामगाव, वाशीम या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे हजारो रुग्णांना लागण होत आहे. नागपुरात तर दररोज दोन हजारापेक्षा जास्त लोकांची तपासणी पॉझिटिव्ह होत असताना एकाही मंत्र्याचे याकडे लक्ष नाही. शासन आपल्या नाकर्तेपणाचा परिचय देत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे फक्त मुंबई पुण्याकडेच लक्ष देत आहेत. विदर्भाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक देखील घेतली गेली नाही. रुग्णांना औषधोपचार उपलब्ध होत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी भरती केले तर बेडची व्यवस्था नाही. बेड मिळाला तर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर अशा पेशंटला भरती करून घेत नाही.

कोरोनाच्या बळींची संख्या विदर्भ नागपुरात दररोज वाढत असताना शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही व मदतही रुग्णांपर्यंत पोहोचत नाही. व्हेंटीलटरची व्यवस्था नाही. महाराष्ट्र सरकारमधील कुणीही मंत्री कोरोनाबद्दल बोलायला तयार नाही. त्यामुळे संक्रमण वाढून रुग्णांचे नाहक बळी जात आहेत. शासनाच्या नाकर्तेपणामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

नागपूर शहरासह नागपूर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे तेथील कोरोना उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये कोणत्याही सोयी नाही. साधे बेडही उपलब्ध नाही. डॉक्टर, नर्स यांच्या सेवा नाही. औषधांची टंचाई आहे. याकडेही कुणाचे लक्ष नाही. रुग्ण बेवारसपणे पडून मृत्युमुखी पडत असून अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.