मुंबई:मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. नांदेडच्या शेलगाव येथून शेकडो मराठा बांधवांनी “आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही” असा निर्धार व्यक्त करत मोर्चात सहभाग घेतला आहे. यासाठी त्यांनी 15-20 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचा साठा सोबत नेला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक ओबीसी बांधवांनीही जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र काहींनी “हे आंदोलन हाके कमिशनसाठी उभं केलं जात आहे” असा आरोपही केला. शेलगावमधील मराठा बांधव अत्यंत आक्रमक दिसून येत असून, “एक मराठा लाख मराठा”, “जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत त्यांनी चळवळीला गती दिली आहे.
शहागडमध्ये जंगी स्वागत-
अंतरवाली सराटीहून निघालेल्या जरांगे पाटलांचे शहागड येथे भव्य स्वागत होणार आहे. यासाठी मोठा क्रेन उभारण्यात आला असून हजारो कार्यकर्ते आणि मराठा बांधव शहागडमध्ये जमले आहेत. तेथून मोर्चा पैठणमार्गे पुढे मुंबईकडे कूच करणार आहे.
वडीगोद्री फाट्यावरून मोर्चा मुंबईकडे-
ताज्या माहितीनुसार, जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे होईल. “सरकारला आम्ही पुरेसा वेळ दिला. कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्रे दिली जात आहेत, मग आता आरक्षण देण्यात विलंब कशाला?” असा थेट सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे.
अंतरवाली सराटीत लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांचा मोर्चा पुढे सरकतो आहे. शहागड आणि जुन्नर मार्गे तो थेट मुंबईत दाखल होणार असून, आता या चळवळीचं रूप अटीतटीच्या लढाईत होणार आहे. “या वेळी आरक्षण घेऊनच परतणार” असा निर्धार मराठा समाजाने केला आहे.