Published On : Mon, Sep 7th, 2020

कुख्यात संतोष आंबेकरचा दुसरा बंगला पाडण्यास सुरुवात

Advertisement

अडीच हजार वर्गफूट क्षेत्रावरील चार मजली इमारतीवर हातोडा

नागपूर : नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत येत असलेल्या आलीशान बंगल्याचे बांधकाम मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूत करण्यात आले. आता नेस्तनाबूत करण्यात आलेल्या त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या अडीच हजार वर्गफूट क्षेत्रावरील चार मजली इमारतीचे अतिक्रमण तोडण्यास मनपाने आजपासून सुरुवात केली. पुढील चार ते पाच दिवस ही कारवाई चालणार आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संतोष आंबेकर या गुंडाची नागपूर शहरात एकच मालमत्ता नसून अनेक हडपलेल्या मालमत्ता आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच त्याचे पुन्हा एक अनधिकृत चार मजली बांधकाम आहे, जे त्याच्या पत्नीच्या अर्थात नेहा संतोष आंबेकर यांच्या नावे आहे. त्याचा घर क्रमांक ४८४ असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टीअंतर्गत येत असल्याने मनपाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र स्लम ॲक्टच्या कलम ३झेड-१ अंतर्गत नेहा संतोष आंबेकर यांना नोटीस बजावली होती. सदर नोटिशीला नेहा आंबेकर यांनी मनपाच्या कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली होती. मालमत्तेसंदर्भात कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने सदर अपील फेटाळण्यात आली. त्यानंतर नेहा आंबेकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली. मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकर यांचे अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज केले.

यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घरात ठेवले होते. घराला सील करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतफेर अपील फेटाळले जाताच गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री.राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण सामान काढण्याबाबत मनपाने सूचित केले. गुन्हे शाखेने तात्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक आज (ता. ७) सकाळी संतोष आंबेकरचे दुसरे घर तोडण्यासाठी पोहचले. तळमजला जवळपास २३१.७७ वर्ग मीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेले चार मजली घर असून त्यावर मनपाचा हातोडा चालविण्यात आला. दाटीवाटीच्या क्षेत्रात हे घर असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सैय्यद साहिल या कुख्यात गुंडाचा बंगलासुद्धा काही दिवसांपूर्वीच मनपाने जमीनदोस्त केला होता, हे विशेष.

सदर कारवाई महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कनिष्ठ अभियंता बर्लेवार, मुख्यालयातील श्री. कांबळे यांनी केली. पोलिस विभागानेसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बंदोबस्त उपलब्ध करून देत या कारवाईत सहकार्य केले.

अनधिकृत बांधकामाबाबत गय करणार नाही : महापौर
महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत गय केली जाणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होती. शिवाय मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीसुद्धा विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे याबाबत (झीरो टॉलरन्स) ठेवून काम करण्याचे निर्देश दिले होते. आजच्या कारवाईतून विभाग त्यादृष्टीने कार्य करीत असल्याचे दिसून आले. यापुढेही अनधिकृत बांधकामविरोधातील मोहीम सुरूच राहील, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले.

Advertisement
Advertisement