Published On : Thu, Jun 3rd, 2021

अजून धोका टळला नाही, सदैव सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक

Advertisement

नागपूर : कोरोनाच्या दुस-या लाटेतील रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी यामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष करून गाफील राहू नका. पहिल्या लाटेनंतर सुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षाची शिक्षा आपल्यालाला दुस-या लाटेमध्ये भोगावी लागली. याशिवाय सध्या म्यूकरमायकोसिसचा सुद्धा धोका वाढत आहे. त्यामुळे पुन्हा कोव्हिडची परिस्थिती ओढवू नये यासाठी धोका टळलेला नाही हे ध्यानात ठेवून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा, सुरक्षेची योग्य काळजी घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी कोव्हिड संवादमध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.३) एलेक्सिस हॉस्पिटलचे कन्सल्टंट पल्मनोलॉजिस्ट डॉ. मनोज पेठे आणि एलेक्सिस हॉस्पिटलचे कन्सल्टंट एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉ.जयंत केलवाडे यांनी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पोस्ट कोविड केअर- रोड टू कॅम्प्लिट रिकव्‍हरी’ या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

मागील दीड वर्षापासून कोव्हिड सोबत आपला संघर्ष सुरू आहे. अशात दुस-या लाटेमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीतून आताशा दिलासा मिळू लागत आहे. मात्र सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोव्हिड नंतर उद्भवणा-या समस्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोव्हिड हा विविध अवयवांना बाधित करणारा आजार असल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोव्हिड नंतर उद्भवलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचे त्वरीत निदान करून उपचार घेणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयातून घरी गेल्यानंतर सुमारे १० दिवसाच्या कालावधीमध्ये कोव्हिड प्रमाणेच लक्षणे दिसून येउ शकतात. ‘पोस्ट कोव्हिड’च्या समस्येबाबत गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे. कोव्हिडमध्ये शरीराची झालेली झिज भरून काढण्यासाठी ताजे अन्न, फळे खा, हलके व्यायाम करा. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी सुरू ठेवायला सांगितलेली औषधे बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या, असाही सल्ला डॉ. मनोज पेठे आणि डॉ. जयंत केलवाडे यांनी दिला.

कोव्हिडशी झुंज सुरू असतानाच आता ‘म्यूकरमायकोसिस’ची भर पडली आहे. हा आजार दुर्मीळ आहे तसेच तो प्रत्येकाला होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही पण सतर्क राहणे आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये लालसरपणा येणे, डोळे दुखणे, सूज येणे, डोळ्याच्या खालच्या भागात दुखणे, नाक पूर्ण बंद झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन आवश्यक उपचार घेतले जावे. ‘म्यूकरमायकोसिस’ हा आजार केवळ डोळे, नाक, कान, सायनस यापुरताच मर्यादित नाही तर तो फुफ्फुसामध्येही होउ शकतो. एकदम जास्त ताप येणे, धाप लागणे, थुंकीमध्ये रक्त येणे अशी ‘पोस्ट कोव्हिड’मध्ये लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोव्हिड आणि म्यूकरमायकोसिस पासून बचावाकरिता मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. मास्क हा जीवनाचा एक भाग करून तो योग्य प्रकारे लावूनच घराबाहेर पडा. याशिवाय सॅनिटायजर ने हात निर्जंतुक करणे, साबणाने हात धुणे, शारीरिक अंतर राखणे यासोबतच मधुमेह नियंत्रित राहावे यासाठी आवश्यक औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करणे, वेळोवेळी मधुमेहाचे नियंत्रण तपासणे हे अत्यावश्यक आहे, असेही डॉ. मनोज पेठे व डॉ. जयंत केलवाडे यांनी सांगितले.

आज समारोप
कोरोनाच्या कठीण काळात लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे आणि आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी २४ मार्च रोजी सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड संवादचा समारोप शुक्रवारी (ता. ४) दुपारी ३ वाजता होईल. ‘कोरोनाकाळात नागपूरकरांनी दाखविलेल्या धैर्याला आणि संयमाला सलाम’ असा समारोपीय कार्यक्रमाचा विषय राहील. यात महापौर दयाशंकर तिवारी, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, सचिव डॉ. सचिन गाथे सहभागी होतील. या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आपण सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.