Published On : Wed, Aug 28th, 2019

पीओपी मूर्तींबाबत 29 पासून करणार मनपा कारवाई

पथकाद्वारे विक्रेत्यांच्या दुकानांची होणार तपासणी

नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना अडसर ठरणा-या पीओपी गणेश मूर्ती विक्रीबाबत मनपाने कठोर पाउल उचलले असून उद्या गुरूवार (ता.२९)पासून मनपाच्या पथकाद्वारे मनपाने ठरवून दिलेल्या निकषांचे उल्लंघन करणा-या मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पीओपी मूर्ती विक्रेत्यांना दिलेल्या निकषासंदर्भात बुधवारी (ता.२८) अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील अतिरिक्त आयुक्त कक्षामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पीओपी मूर्ती विक्रेत्यांसाठी मनपातर्फे ठरवून दिलेल्या निकषाचे पालन होत नसल्याची बाब ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेश मूर्ती विक्रेत्यांना परवानगी दिली जाते. मूर्ती विक्रीची परवानगी देताना परवानगी पत्रामध्येच पीओपी मूर्तीचे निकष दर्शविण्यात आले आहेत. निकषानुसार पीओपी मूर्ती विक्री करणा-याला दुकानापुढे बॅनर लावून आमच्याकडे पीओपी मूर्तीची विक्री होत असून या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम टँकमध्येच करण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. शिवाय पीओपी मूर्तीच्या मागे लाल निशान लावणेही बंधनकारक आहे. मात्र या निकषांचे विक्रेत्यांकडून पालन होत नाही त्यामुळे याबाबत कारवाई करण्याची मागणी ग्रीन व्हिजिल फाउंडेशनतर्फे करण्यात आली.

या मागणीवर दखल घेत उद्या गुरूवार (ता.२९)पासून मनपाच्या पथकाद्वारे सर्व मूर्ती विक्रेत्यांची तपासणी करण्यात यावी तसेच पीओपी मूर्तीसंदर्भात मनपाने ठरविलेल्या निकषांचे उल्लंघन करणा-या मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्याकडून पीओपी मूर्ती संदर्भात मनपाने ठरविलेल्या निकषांचे योग्य पालन व्हावी याचीही दखल घेण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.