विजेत्या मंडळाला मिळणार 1 लाखांचे बक्षीस
नागपूर. नागपूर महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्या वतीने पाणी संवर्धन व पाणी बचत हा संदेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून देण्याकरिता गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.
नागपूर शहरातील पाण्याची टंचाई लक्षात घेता नागपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पाण्याच्या बचतीचे व पाण्याच्या संवर्धनाचे संदेश देता यावे, याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे विषय 1) पाणी पुनर्भरण 2) जलाशयाचे प्रदूषणापासून संरक्षण 3) भविष्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती व त्याच्या उपाययोजना असा स्वरूपाचे राहणार असून गणेश मंडळाने वरील कोणत्याही एका विषयावरील देखावा तयार करायचा आहे.
या स्पर्धेमध्ये पारितोषिक स्वरूपामध्ये प्रथम येणाऱ्यास रूपये 1 लाख रूपये, द्वितीय येणाऱ्यास 51 हजार रूपये, तृतीय क्रमांकास 21 हजार रूपये देण्यात येणार आहे. जे गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्यांनी शिल्ड व प्रमाणपत्र मिळणार आहेत. शहरातील गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होण्यासाठी आपले नावे संबंधित मनपा झोन कार्यालयात संपर्क साधावा. शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जलप्रदाय समिती सभापती (विजय) पिंटू झलके यांनी केले.