Published On : Wed, Sep 30th, 2020

मनपा करणार ‘फ्रंटलाइन स्टाफ’चे समुपदेशन

ई-साय क्लीनिक चे तज्ञ डॉक्टर समाधान करणार

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला न घाबरता नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अहोरात्र काम करणा-या नागपूर महानगरपालिकेच्या ‘फ्रंटलाईन स्टाफ’चे मनपा व गुडगांव येथील ई-साय क्लीनिक (ePsyclinic) संयुक्तरित्या समुपदेशन करणार आहेत. जवळपास ५०० डॉक्टर्स, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा सहायक, ए.एन.एम. वर्कर्स आणि ६५०० सफाई कामगार यांना याचा लाभ मिळणार आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि ई-साय क्लीनिकच्या श्रीमती शिप्रा डावर यांनी सोमवारी (२८ सप्टेंबर) सामंजस्य करार (एम.ओ.यू.) वर हस्ताक्षर केले. नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावात नागरिकांना अविरत सेवा देत आहेत. या सात महिन्याच्या कालावधीत त्यांची मानसिक अवस्था खालावली आहे. त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यासाठी ई-साय क्लीनिक चे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनपाच्या फिल्डस्टाफ सोबत टेलीकॉन्फर्न्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या शंकांचे समाधान करणार आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत समुपदेशन केले जाणार आहे. बुधवारपासून (३० सप्टेंबर) या समुपदेशन कार्याला सुरुवात झाली आहे. हे समुपदेशन कार्य 24 X 7 चालणार आहे. “टूगेदर वुईकॅन” संस्था सुध्दा यामध्ये सहभागी झाली आहे.

मनपा आयुक्त श्री.राधाकृष्णन बी. म्हणाले की, कोव्हिड-१९ च्या काळात तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात उपयोग करून नागरिकांना, मनपा कर्मचा-यांना संकट काळात मदत करण्याची आवश्यकता आहे. टेलीकॉन्फरर्न्सिंगच्या माध्यमाने जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येते. नाविण्यपूर्ण पध्दतीने नागरिकांशी कमीत – कमी वेळेत संपर्क करता येईल. या टेलीकॉन्फरर्न्सिंगचा लाभ मनपाचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि सफाई कर्मचा-यांना होईल व ते मानसिक दुविधेतुन बाहेर पडतील.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, मनपाचे कर्मचारी मागील सात महिन्यापासून सतत कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी काम करीत आहे. मानसिक समुपदेशनाने त्यांना मानसिक आधार मिळेल आणि ते जोमाने पुन्हा कामाला लागतील.