Published On : Wed, Sep 30th, 2020

एका क्लिकवर कळणार बेड उपलब्धतेची माहिती

· जिल्ह्याचे कोरोना अपडेट

· संकेतस्थळ तयार

· ग्राफिक्ससह विविध माहिती

· covid19bhandara.online

· जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

भंडारा : कोरोना विषयी जिल्ह्याची अद्ययावत माहिती हवी आहे, रुग्णालयात किती बेड रिक्त आहेत, जिल्ह्यात किती चाचण्या झाल्या, आज किती पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह ही सगळी माहिती हवी असेल तर covid19bhandara.online या संकेतस्थळाला भेट द्या व जिल्ह्याची कोरोना बाबतची इत्यंभूत माहिती जाणून घ्या.

कोरोना विषयी सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने covid19bhandara.online हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेस्थळावर जिल्ह्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, उपचाराखालील रुग्ण, बरे झालेले रुग्ण, दैनंदिन चाचण्या, एकूण चाचण्या, दैनिक मृत्यू, एकूण मृत्यू या सोबतच कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत ही सगळी माहिती या संकेतस्थळावर अद्ययावत स्वरूपात नागरिकांना पहायला मिळणार आहे.

कोरोना बाबतची अद्ययावत माहिती विविध ग्राफच्या स्वरूपातही या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णालयात किती बेड आहेत त्यापैकी किती भरले आहेत व किती रिक्त आहेत ही माहिती नागरिकांना अतिशय उपयुक्त अशीच आहे. बऱ्याचवेळा शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत असा समज करून घेतला जातो या संकेतस्थळामुळे नागरिकांचा हा समज दूर होण्यास मदत होणार आहे.