Published On : Mon, Jul 26th, 2021

शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार-जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : शहीदांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबियांना प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे केले.

कारगिलच्या युध्दात भारतीय सैनिकांनी शर्थीची झुंज दिली. 22 वर्ष झालेल्या कारगिल युध्द म्हणजे जवानांच्या हुतात्मांची वीरगाथा असून सैनिकांच्या पराक्रमामुळेच मिशन विजय फत्ते झाले होते. कारगिलचे युध्द म्हणजे शौर्यगाथा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात आयोजित कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेंद्रकुमार चवरे, माणिक इंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी विमला. आर यांनी शहीद भुषणकुमार सतई व शहीद नरेश बडोले यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कारगिल युध्द 3 मे 1999 ते 26 जुलै 1999 पर्यंत चालले. एकुण 2 महिने, 3 आठवडे व 2 दिवस युध्द चालले. या युध्दात जवळपास 527 सैनिक शहीद झाले व 1363 जखमी झाले. जिल्हयातील सैनिकांनी या युध्दात सहभाग घेतला होता, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती खरपकर यांनी यावेळी प्रास्ताविकात दिली.

विरमाता मिरा रमेशराव सतई, विरपत्नी प्रमिला नरेश बडोले यांचा जिल्हाधिकारी विमला. आर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी शहीदांच्या कुटुंबियासमवेत संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. शहीदांच्या हुतात्म्यांचे विस्मरण होणार नाही. तसेच त्यांच्या कुटुंबियांचा शासकीय योजनांमध्ये प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे त्यांनी आश्वस्त केले.