Published On : Thu, Dec 5th, 2019

कुटुंबाच्या रागावर मुलाने सोडले घर

Advertisement

– कर्तव्यदक्ष जवानामुळे मुलगा सुखरुप
– नागपूर रेल्वे स्थानावरील घटना

नागपूर– अलिकडे मुलांना रागावण्याचाही अधिकार पालकांना राहीला नाही. अभ्यासासाठी आई वडिल तर बोलतीलच. परंतु वयच तसे असल्याने पालकांचे रागावने मुलांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे राग मनात धरून मुले घर सोडतात. असाच काहीसा प्रकार बुधवारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला.

मात्र, कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानामुळे तो मुलगा सुखरुप आहे. समाजविघातकांच्या हाती लागण्यापूर्वीच एएसआय बी.एस. बघेल यांनी आस्थेने त्याची विचारपूस करून चाईल्ड लाईनच्या मदतीने नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आले.

रायपूर येथील आठ वर्षाचा राकेश (काल्पनिक नाव) घरच्यांच्या रागावर घरून निघाला. मिळेल त्या गाडीने तो नागपूर रेल्वे स्थानकावर आला. दुपारी १.१० वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशदाराजवळ निरागस स्थितीत होता. एएसआय बघेल यांचे त्या मुलाकडे लक्ष गेले. दुसèयाच क्षणी त्यानी मुलाची विचारपूस केली. मात्र, तो नागपुरातील नातेवाईकांकडे आल्याचे सांगत होता. त्याच्या बोलण्यावर बघेल यांचा विश्वास बसला नाही.

चाईल्ड लाईनच्या मदतीने त्याला आरपीएफ ठाण्यात आणून आस्थेनी विचारपूस केली. त्याच्या खिशात एका कागदारवर नातेवाइकाचा मोबाईल क्रमांक होता. त्यावर फोन करून बघेल यांनी माहिती दिली. काही वेळातच त्यांचे नातेवाईक आरपीएफ ठाण्यात पोहोचले. आरपीएफने त्यांची खात्री केली. चाईल्ड लाईनच्या उपस्थितीत राकेशला नातेवाईकांच्या सुपूर्द केले.