Published On : Thu, Dec 5th, 2019

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची दीक्षाभूमीला भेट

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचे आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर नाना पटोले यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दीक्षाभूमीवरील बौध्दस्तूपाच्या आतील तथागत गौतमबुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेवून अभिवादन केले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, आर.एन.सुटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथून निघून नाना पटोले यांनी हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा या धार्मिक स्थळी भेट दिली. तेथे चालू असलेल्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली.

सीताबर्डी येथील श्री. गणेश मंदिर टेकडी येथे नाना पटोले यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरामध्ये मंदिर सुशोभित करण्यासाठी सुरु असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या वतीने मंदिराच्या परिसरात श्री. पटोले यांची धान्यतुला करण्यात आली. यावेळी आमदार विकास ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमदरे, माजी मंत्री अनिस अहमद, गिरीष पांडव तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

नाना पटोले यांचा दौरा
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे उद्या गुरुवार, दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने रहाटे कॉलनी, नागपूर येथून भंडाराकडे प्रयाण करतील.

दिवसभर स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सोईनुसार मोटारीने साकोली येथून नागपूरकडे प्रयाण व रात्री मुक्काम करतील.