| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 27th, 2018

  टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

  Sachin Sawant
  मुंबई: टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

  यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले की, या अगोदरही अशाच त-हेचे काही व्हिडोओ टी सीरीज कंपनीतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. पंरतु राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस नाचता गाताना प्रथमच दिसलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेला जवाबदेह असल्याने काँग्रेस पक्ष यासंदर्भात काही मुलभूत प्रश्न उपस्थित करित असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत आहे.

  काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

  1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबीक नाते आहे? यामधील आदान प्रदान काय आहे?

  2. सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.

  3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली?

  4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिका-यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का? कलाकारांचे मानधन कोणी दिले? व या व्हिडीओचा खर्च कोणी केला?

  5. शासकीय अधिका-यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले? सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का?

  6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली?

  7. सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिका-यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले?

  8. स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिका-यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ठ केले गेले याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का?

  9. असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करित आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई, इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का?

  10. अशा व्हिडीओ मध्ये काम करण्याकरिता त्या त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का?

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145