Published On : Tue, Dec 3rd, 2019

महापौरांच्या जाहिरात फलकावर चालला बुलडोजर

अवैध होर्डींगवर कारवाई : महापौरांकडून पथकाचे अभिनंदन

नागपूर : शहरातील विविध भागात अवैधरित्या होर्डींग लावून शहर विद्रुप करणा-यांविरोधात मंगळवार(ता.३)पासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अवैध होर्डींगबाबत कारवाई दरम्यान अवैधरित्या लावण्यात आलेले महापौरांचेही होर्डींग यावेळी काढण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे अवैध होर्डींगबाबत सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीबाबत सोमवारी (ता.२) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व अधिका-यांना निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार मंगळवार(ता.३)पासून अवैध होर्डींग काढण्याबाबत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत महापौर संदीप जोशी यांचे अभिनंदन करणारे फलक अवैधरित्या लावण्यात आल्याचे दिसून आले. विद्युत खांबावरील महापौरांच्या होर्डींगवर मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बुलडोजर चालविण्यात आले आहे.

मनपा पथकाद्वारे अवैध होर्डींगबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत महापौर संदीप जोशी यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. नियम सर्वांना सारखे असून नियमाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कुणीही असली तरी त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. नियमाचे उल्लंघन करणा-या कुठल्याही पदाधिका-याची भिती न बाळगता त्यांच्यावर होणारी कारवाई ही स्वागतार्हच आहे, अशा शब्दांत महापौरांनी पथकाचे कौतुक केले.

शहरात विद्युत खांब, सिग्नल, झाडे, इलेक्ट्रिक डीपी बॉक्स, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या होर्डींग लावले जात आहेत. यासर्वांवरही त्याच धैर्याने कारवाई करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.