नागपूर: शहरातील भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अग्नितांडव पाहायला मिळाले. या घटनेला पाच दिवसाचा कालावधी लोटला असतानाही आग अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सलग तीन दिवसांपासून जळणाऱ्या कचऱ्यातून उठणाऱ्या विषारी धुरामुळे नागपूर शहराचा श्वास घोटला जात आहे. हवेपासून ते जमिनीपर्यंत आणि पाण्यापर्यंत सर्व काही प्रदूषित होत आहे.
हजारो टन कचरा आता राखेत रूपांतरित झाला आहे. पण नागपूर महानगरपालिका ही राख सुद्धा सुरक्षितपणे विल्हेवाट लावत नाही. ही राख आता हवेच्या माध्यमातून नागपूरच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे.
या पर्यावरणीय संकटासाठी केवळ NMC नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) सुद्धा तितकाच जबाबदार आहे. MPCB ची जबाबदारी आहे की अशा घटना घडताच तातडीने कारवाई करावी. मात्र यावेळी MPCB च्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चुप्पी साधली असल्याने नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या घटनेची गंभीरता लक्षात घेताना ‘नागपूर टुडे;च्या टीमने MPCB च्या प्रादेशिक अधिकारी हिमा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. “MPCB ची टीम घटनास्थळी गेली का?” या प्रश्नाला त्यांनी केवळ “हो” असे उत्तर दिले. पुढे विचारलेल्या “काय कारवाई केली?” या प्रश्नाला मात्र त्यांनी कोणतेही उत्तर न देता कॉल थेट बंद केला.
या घटनेबाबत नागरिक अंजया राजम अनपार्थी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र लिहून नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अधिकाऱ्यांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी नमूद केले की, ही घटना अपघाती नसून NMC च्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि कचरा व्यवस्थापन नियमांचे सातत्याने उल्लंघन यांमुळेच उद्भवली आहे.
त्यांनी खालील कारवायांची मागणी केली आहे:
जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवणे,
मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी,
विभागीय चौकशीचे आदेश,
भांडेवाडी डंपिंग यार्डचे परवाने रद्द/निलंबित करणे.
पत्रात असेही नमूद केले आहे की, शेकडो कोटींचे केंद्रीय निधी असूनही NMC नी कचऱ्याचे वर्गीकरण, वैज्ञानिक प्रक्रिया, व पुनर्वापरात गंभीर त्रुटी दाखवल्या. डंपिंग यार्डमध्ये अजूनही संमिश्र कचरा प्रक्रिया न करता टाकला जातो आहे. यामुळेच आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पत्राच्या अखेरीस त्यांनी MPCB कडून त्वरित कारवाईची मागणी करत नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास परत मिळवण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram