नागपूर : महाराष्ट्रात २४ एप्रिलपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत तापमानात तीव्र वाढ, गारपीट आणि पावसाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील उष्णतेचा जोर-
अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये २४ एप्रिल रोजी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना दुपारच्या वेळात बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाड्यात उष्णतेचा इशारा-
उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट दिला असून, या भागांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊ शकते.२६ एप्रिल रोजी नांदेडमध्ये पावसाची शक्यता असून, २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
नागपूरसह ‘या’ भागात गारपीट होण्याची शक्यता-
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांसह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन-
उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी दुपारी घरातच थांबा, भरपूर पाणी प्यावे आणि थेट सूर्यप्रकाश टाळावा. विजांच्या आवाजात उघड्यावर किंवा झाडांखाली थांबणे धोकादायक ठरू शकते. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहा.