Published On : Sun, Dec 8th, 2019

गोबेल नीती विचाराचे लोक आहेत असं म्हटलं होतं;मात्र मला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे – नवाब मलिक

मुंबई : टिव्ही शो मध्ये गोबेलनीती विचाराचे लोक आहेत असं म्हटलं होतं मात्र त्याचे एडिट करून माझी बदनामी भाजपकडून केली जात आहे शिवाय मला ट्रोल करुन धमक्याही दिल्या जात आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

देशात न्यूज – १८ इंडिया या वृत्तवाहिनीचा सायंकाळी ६ वाजता आरपार नावाचा डिबेट शो असतो त्याचे अॅंकर अमीष देवगण होते. त्यावेळी ‘नसीरुद्दीन शहा डर रहे है या डरा रहे है’ यामध्ये राष्ट्रवादीतर्फे मी सहभागी झालो होतो. त्यावेळी भाजपचे संबित पात्रा होते. मला भाजपाच्या आयटी सेलकडून २१ डिसेंबर २०१८ ला धमकी आली शिवाय विदेशातून धमक्या दिल्या गेल्या. ट्रोल करण्यात आले. बजरंग दलाचे लोक हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले.
याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. शिवाय
देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली होती.परंतु मला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

भाजपाचे संबित पात्रा खोटं बोलून चर्चा फिरवतात गोबेल नीतीबाबत बोलत असताना गोबेलच्या विचाराचे काही लोक आहेत असं बोललो होतो मात्र
संबित पात्राने त्या वाक्याचा गोबर असा उल्लेख केला. आज तेच भाजपाच्या आयटीसेलकडून
एडिट करून देशभरात पसरवले जात आहे. त्यामध्ये मोदी ज्यांना फॉलो करतात त्यांच्या अकाऊंटवरुनही माझी बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

याप्रकरणी पोलिस कारवाई करावी म्हणून आम्ही रितसर तक्रार दिली आहे. भाजपाला सांगू इच्छितो की, लढाई राजकीय करा. मी चुकीचं बोललो असेल तर मला सांगा.मात्र अशा पध्दतीने माझ्या ओळखीची बदनामी करु नका असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नवाब मलिक यांनी सिंचन घोटाळा आणि उन्नाव व हैदराबाद बलात्कार घटनेवरही भाष्य केले.

सिंचन घोटाळा झाला असे भाजप ओरडत होते. किंमत वाढ हाच भ्रष्टाचार आहे असं भाजप बोलत होते. त्यानंतर अजितदादा पवार यांनी राजीनामा दिला. कोर्टात सत्य परिस्थिती सादर करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे कोर्टात याचिका दाखल करून अजितदादा पवार यांच्या विरोधात दाद मागितली होती. चौकशी सुरु होती. एसीबीने यात अजितदादा यांचं नाव नाही असे स्पष्ट केले आहे. हे गेले पाच वर्षे आम्ही बोलत होतो. गैरव्यवहार केले नाहीत. नियम तोडून केले नाही. ते आता सिद्ध झाले आहे. भाजपाचा खोटा प्रचार समोर आला आहे.
सिंचन घोटाळ्यात खोटे आरोप होते हे आता सिद्ध झाले असून पक्षाची व नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने आरोप केले होते असेही नवाब मलिक म्हणाले.

आज उन्नाव रेपमधील पीडीतेचा आज मृत्यू झाला आहे. ती पीडीत ९५ टक्के भाजली होती. ९५ टक्के भाजलेली असताना हृदयविकाराने निधन झाले असल्याचा रिपोर्ट देणं हा आरोपींना वाचवण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होते आहे असा आरोप करतानाच सिंगर यांना वाचविण्यासाठी उत्तरप्रदेशने काय काय केले आहे हे पाहिले आहे. त्यामुळे हा रिपोर्ट शंका निर्माण करणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

देशात बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अल्पवयीन मुलींवरही बलात्कार होत आहेत. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना जनतेत व्यक्त होत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

जी घटना घडते त्यानंतर पोलिसांनी तात्काळ प्रक्रिया सुरू केली पाहिजे. लगेच फास्ट ट्रॅक कोर्ट चालले पाहिजे. न्याय मिळण्याबाबत विचार व्हावा शिवाय कायद्यातही बदल व्हायला हवा. हैदराबाद घटनेचे समर्थन होवू शकत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.