Published On : Wed, Jun 6th, 2018

अमित शहा यांना काँग्रेसची एवढी भीती वाटते का? स्थानबद्ध निरुपम यांचा सवाल

मुंबई :भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. अमित शाह यांना घेराव घातला जाईल, या भीतीने पोलिसांनी नजरकैदेत टाकल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी आरोप केला आहे.

अंधेरीतील संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. आपल्याला मुंबई पोलिसांनी अंधेरी येथील राहत्या घरी स्थानबद्ध केले अशी माहिती त्यांनी दिली .

निरुपम यांनी अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विरोधी भूमिका घेतली नव्हती. कोणतेही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला नसताना आपल्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई कशासाठी असे निरुपम यांनी म्हटले आहे. अमित शहा यांना काँग्रेसची एवढी भीती वाटते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थइत केला आहे.