Published On : Wed, Aug 28th, 2019

नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले

एक हजार मुलांमागे ९६८ मुली : पीसीपीएनडीटी बैठकीत माहिती सादर

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. २०११च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच सदर येथील रोग निदान केंद्र येथे पीसीपीएनडीटी अंतर्गत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

बैठकीत मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, सदर रोग निदान केंद्राच्या डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. अजुंम बेग, कल्पना वानखेडे, प्रदीप कुंभारे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स, आशा सेविका, टी.बी. कर्मचारी आदी उपस्थित होते.

मुलींचे जन्मदर कमी होण्यामागे समाजातील मानसिकता जबाबदार आहे. शहरात लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी जनजागृती केली जाते. सर्व डॉक्टर्सचे प्रशिक्षणही घेण्यात येते. याशिवाय सोनोग्रॉफी करणा-या डॉक्टर्सचेही प्रबोधन करण्यात येते. त्याचेच फलित म्हणून शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०११च्या जनगणनेनुसार एक हजार मुलींमागे ९२६ एवढे मुलींचे प्रमाण होते तर जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये एक हजार मुलींमागे ९६८ एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे म्हणाल्या, शहरामध्ये पीसीपीएनडीटी नियमांचे व्यवस्थित पालन केले जाते. शिवाय मनपाच्या डॉक्टर्सतर्फे दर तीन महिन्यांनी शहरातील ६३० सोनाग्रॉफी केंद्राला भेट देउन तपासणीही केली जाते, त्याचेच यश आज शहरातील मुलींच्या वाढत्या जन्मदराद्वारे दिसून येत आहे.

उपकरणांना एमआरसी क्रमांक देण्यात येतो. पीसीपीएनडीटी अंतर्गत नोंदणी असलेल्या शहरातील एकूण ७९२ उपकरणांना एमआरसी क्रमांक देण्यात येत आहे. यामध्ये ७२३ सोनोग्रॉफी उपकरणे तरे १७ एमआरआय, 43सीटी स्कॅन, 9बी स्कॅन या उपकरणांचा समावेश आहे. शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढणे ही आनंददायी बाब आहे. सामाजिक मानसिकता बदलत असल्याचे यावरून दिसून येत आहे. मात्र शहरातील सोनोलॉजिस्ट, स्त्री रोगतज्ज्ञ यांनीही सजग राहणे आवश्यक कुणीही लिंग निदान करू नये व इतरत्र कुठेही होउ नये, याची सर्वांनी जबाबदारीने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले.

एखादी डॉक्टर सोनोग्रॉफी करुन गर्भातलील लिंग चाचणी करुन मुलगा किंवा मुलगी असल्याचे सांगत असल्यास त्याचे नाव विभागाला कळवावे ते सिद्ध झाल्यास माहिती देणा-याला शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस जाहीर आहे. याशिवाय डिकॉय केस यशस्वी झाल्यास शासनातर्फे २५ हजार रुपये व डॉक्टर्सच्या आय.एम.ए. संस्थेतर्फेही बक्षीस देण्यात येते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जन्मदर गुणोत्तर तक्ता