Published On : Tue, Feb 18th, 2020

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या २ आरोपींचा जामीन अर्ज मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने फेटाळून लावला. राकेश भारती आणि दयानंद निर्मलकर असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनांक १३ फेब्रुवारी रोजी थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी प्रकाश नगर येथे दयानंद निर्मलकर यांच्याकडे गेले होते. वीज ग्राहकाने थकबाकीची रक्कम न देता महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.या नंतर महावितरणकडून कळमना पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ३३२, ३५३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी राकेश भारती आणि दयानंद निर्मलकर यांनी अर्ज केला होता. सरकारकडून जामीन अर्जास विरोध करण्यात आला. आरोपीकडून गाडी आणि मोबाईल जप्त करणे बाकी आहे. तसेच एका आरोपीच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान आज जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली असता, महावितरणची बाजू मांडणाऱ्या मोदी अँड अकबानी असोसिएटचे वकील अतुल मोदी आणि रफिक अकबानी यांनी घटनेच्या दिवशी महावितरणकडून करण्यात आलेले छायाचित्रण न्यायालयासमोर सादर करून प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. शासकीय कर्मचाऱ्यास या पद्धतीने मारहाण करणे चुकीचे असून यामुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

महावितरणकडून जमीन अर्जास विरोध करण्यात आला. न्यायालयाने महावितरणची बाजू योग्य असल्याचे सांगत जमीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीच्या वतीने अमोल जलतारे यांनी बाजू मांडली.

न्यायालयाच्या निर्णयाचे महावितरणच्या कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.