Published On : Tue, Feb 18th, 2020

भांडेवाडीतील कच-यावर होणार वैज्ञानिक पदध्तीने प्रक्रिया

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा निर्णय : स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटींची तरतूद

नागपूर : पूर्व नागपूरातील भांडेवाडी आणि जवळपासच्या परिसरात राहणा-या हजारो नागरिकांना भेसडवणा-या कच-याच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आरोग्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. आयुक्तांनी नागपूरकरांसाठी भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये वर्षानुवर्षे जमा झालेला कचरा वैज्ञानिक पध्दतीने बायोमायनिंग करुन ती जमीन मुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी मागच्या आठवडयात भांडेवाडी डंम्पिग यार्डला भेट दिली होती. तिथे कच-याचे मोठे ढिगारे पाहून ते व्यथित झाले होते. त्यांनी संबंधित अधिका-यांना त्रुटीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. उन्हाळयात कच-यामध्ये आग लागण्याचे प्रकार होतात आणि वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त नागरिकांमध्ये अस्थमासारख्या रोगाचे प्रमाण वाढते. या विरोधात परिसरातील नागरिकांनी हरितलवादात एक याचिका दाखल केली आहे.

दरम्यान नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. नागपूर शहरातून येणारा कचरा एकत्रीत करण्यासाठी ट्रान्सफर स्टेशनचा प्रस्ताव होता. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पाच ट्रांसफर स्टेशन प्रस्तावित करण्यात आले होते. घरा-घरातून एकत्रित होणारा कचरा छोट्या गाडयांच्या माध्यमातुन ट्रान्सफर स्टेशनला आणणे आणि त्या कच-याला मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडी पर्यंत नेणे अशी प्रक्रीया प्रस्तावित होती. यासाठी निविदा प्रक्रीया प्रारंभ झाली होती. स्मार्ट सिटी प्रकल्पातुनच ४० कोटींची तरतुद करण्यात आली होती. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी संभाळल्यानंतर प्रस्तावित ट्रांसफर स्टेशनची निविदा प्रक्रिया रद्द करुन त्याचे ४० कोटी रुपये बायोमायनिंग प्रकल्पात उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चेअरमन श्री. प्रवीण परदेशी यांना ही या संदर्भात माहिती दिली होती.

भांडेवाडी मध्ये ६-८ लाख मेट्रीक टन जुना कचरा जमा आहे.कच-याच्या ढिगा-यामुळे ‍त्यावर प्रकीया करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. या कच-यावर वैज्ञानिक पध्दतीने प्रक्रीया झाल्यास ३२ एकर जागा मनपाला उपलब्ध होऊ शकते. या जागेचा उपयोग भांडेवाडी डंम्पिग यार्ड मध्ये जमा होणा-या कच-यावर वैज्ञानिक पध्दतीने प्रक्रीया करण्याकरीता उपयोग होऊ शकतो.

आयुक्तांनी दिला “चार आर” चा मंत्र
स्वच्छतादुतातर्फे जमा करण्यात येणारा कचरा हा भांडेवाडी पर्यंत विलग स्वरुपातच यावा यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातुनच ओला व सुका कचरा विलग स्वरुपात दयावा, असे आवाहन करतांनाच आयुक्त श्री.तुकराम मुंढे यांनी नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी चार आर चा मंत्र दिला आहे. आयुक्तानीं नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी घरात उत्पन्न होणारा कचरा कमी करावा. त्यांनी याला रिडयूस (Reduce) असे सांगितले आहे. आयुक्तांनी सुका कच-याचा पुनर्वापर (R- रियूज) करण्याचे आवाहन केले आहे. तिसरा आर म्हणजे पूनर्प्रक्रीयाचा (R- Recycle) आहे. आयुक्तांनी ओला आणि सुका कच-यावर पुनर्प्रक्रीया करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहे. त्यांनी चौथ्या आर चा मंत्र देतांना नागरिकांना प्लास्टीक चा उपयोग टाळण्याचा (Refuse) आग्रह केला आहे.