-ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंदचा निषेध
नागपूर – केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत बंद करण्यात आली. या निर्णयाचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. शुक्रवार 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास महिला काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेने जाणार्या तसेच परतणार्या ज्येष्ठ प्रवाशांसी चर्चा करून रेल्वे सवलती संदर्भात त्यांचे मनोगत जाणून घेतले. तसेच सवलतीची मागणी केली. यानंतर संविधान चौकात नारेबाजी करण्यात आली.
डॉ. रिचा जैन यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दुपारी अडीच वाजताच्या सुमारास प्रदेशच्या पदाधिकारी रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. फलाट क्रमांक एकवर आल्यावर प्रदेशच्या बॅनर घेवून प्रवाशांचे मनोगत जाणून घेतले. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासात सवलतीची मागणी केल्याचे डॉ. रिचा जैन यांनी सांगितले. यानंतर संविधान चौकात नारेबाजी करण्यात आली.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनीया गांधी यांच्याशी असभ्य वर्तनुक केल्याबध्दल केंद्रिय मंत्री स्मृति ईरानी यांनी जाहिर माफी मागावी. त्या सुध्दा एक महिला असून महिलेचा अपमान केला. या घटनेचा निषेध नोंदविला.
याप्रसंगी कांता पराते, आशा राऊत, नफिशा अहमद, ओबिसी विभाग प्रदेश सरचिटणिस विजया डॉ.संजय धोटे, वर्षा गुजर, पूनम कामळे, अनिषा शेख, छाया निमसरकार, पार्वती राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ जवानांचा चोख बंदोबस्त असताना महिला पदाधिकारी स्टेशनच्या आत पोहोचल्याच कशा याची रेल्वे अधिकारी आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आंदोलन नव्हे प्रवाशांचे मनोगत
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रदेश काँग्रेसच्या महिला पदाधिकारी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर तासभर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी शांततापूर्वक नारेबाजी केली. यासंदर्भात महिला पदाधिकारी, डॉ. रिचा जैन, आशा राऊत, नफिशा अहमद यांच्याशी संपर्क साधला असता आंदोलन नव्हे केवळ प्रवाशांचे मनोगत जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले.