नागपूर. केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोगच्या स्फुर्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय कार्यालय, नागपूर आणि हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्था घोगली, महादुला यांच्यावतीने आयोजित “बी टू बी” कार्यक्रम रविवारी नागपुरातील द्वारकामाई हॉटेल येथे संपन्न झाला.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे विभागीय संचालक राघवेंद्र महिंद्रकर यांच्या हस्ते बी टू बी कॉन्फरन्सचे उद्घाटन झाले. याप्रसंगी खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे विभागीय सहसंचालक राजेंद्र खोडके, राजेश मालवीय, अनिल निमोरकर, तनवीर मिर्झा, मिटकॉन नागपूरचे मुख्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर चौधरी, कार्यक्रमाच्या आयोजक हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष माजी नगरसेविका हिरा गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेच्या अध्यक्षा हिरा गेडाम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आज ५३३ महिलांना रोजगार उपलब्ध झालेला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी हिरा गेडाम यांचे विशेष अभिनंदन केले. महिलांनी तयार केलेल्या वस्त्रांना बाजारात योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनाचे उत्तमरित्या मार्केटिंग व्हावे यादृष्टीने आज कार्य करण्याची गरज आहे व त्यासाठी नेहमी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याची डॉ.राऊत यांनी यावेळी ग्वाही दिली.
विशेष म्हणजे, या कॉन्फरन्समध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या स्फूर्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्या वस्त्रांचे फॅशन शोद्वारे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वस्त्रांपासून ते आताच्या नव्या युगात तरुणाईला आकर्षीत करणा-या खादीच्या वस्त्रांचे यावेळी सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली.
खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूर विभागीय कार्यालयाच्या मार्गदर्शनात हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डायना लिंगेकर यांनी केले.